शहरातील बहुतेक रस्त्यांची अवस्था कमालीची बिकट झाली असून, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. औरंगाबाद शहराला साजेसे चकाचक रस्ते केले जातील, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी दिली.
दरम्यान, शहरातील गेल्या ३ वर्षांपासून अपूर्ण असलेले रस्ते व पाणीपुरवठय़ाची कामे महिनाभरात सुरू करण्याचे आदेश मंत्री कदम यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमुळे लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे रस्ते व पाण्याच्या उपाययोजना होईपर्यंत ही वसुली थांबविण्याचे आदेशही कदम यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या आढावा बैठकीत कदम यांनी सांगितले की, शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते असावेत, या साठी राज्य सरकारच्या बांधकाम विभागामार्फत २६ कोटी रुपये खर्चाची रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात ६ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी कमी पडणारे ८ कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून दिले जातील.
खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संदीपान भुमरे व संजय शिरसाट, माजी आमदार अण्णासाहेब माने, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सी. पी. जोशी, अधीक्षक अभियंता यू. के. आहेर आदी या वेळी उपस्थित होते. मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस महापौर कला ओझा, खासदार खैरे, आमदार शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त प्रकाश महाजन आदी या वेळी उपस्थित होते. बैठकीत वीजपुरवठा, रस्त्यांची कामे, अनधिकृत नळजोडण्या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यास कायमची उपाययोजना राबवणार
औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री कदम यांनी केली. जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या बाधित जमिनीची व त्यावरील कर्ज, थकित रक्कम, मुला-मुलींचे विवाह, कौटुंबिक अवस्था आदींचे अंदाज घेणारे हे सर्वेक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी करावे, असे आदेश कदम यांनी दिले. जिल्ह्य़ातील १ हजार ३८२ गावांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमी पावसामुळे खालावल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.