मुंबईच्या अन्य भागांच्या तुलनेत जी दक्षिण वॉर्डमध्ये करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. वरळी, लोअर परेल आणि प्रभादेवीचा भाग जी दक्षिणमध्ये येतो. हा COVID-19 चा मुंबईतील हॉटस्पॉट आहे. चार एप्रिलला जी साऊथमध्ये ५८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. दुसऱ्या दिवशी हा आकडा ६८ पर्यंत वाढला. सहा एप्रिलला ही संख्या ७८ झाली. बुधवारी या भागातील करोना बाधितांची संख्या १३३ पर्यंत पोहोचली.

आठडयाभराच्या आत या वॉर्डमध्ये करोना बाधितांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे. ई-वार्डमध्ये येणाऱ्या भायखळयात करोनाचे ५९ रुग्ण आहेत. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत.

“जी साऊथमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू शकते आणि ही वाईट गोष्ट नाहीय. आपण आता चौथ्या आठवडयामध्ये आहोत आणि या स्टेजमध्ये करोना बाधितांची संख्या वेगाने वाढते. मंगळवारपर्यंत महाराष्ट्रातील ७६ टक्के प्रकरणांमध्ये करोनाची कुठलाही लक्षणे आढळून आली नव्हती. जी साऊथमध्ये रुग्ण संख्या वाढतेय त्यात बहुतांश जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. चाचणी करेपर्यंत लोकांना माहितच नाहीय की, त्यांच्या शरीरात हा व्हायरस आहे. धारावीतही आम्ही जी साऊथचे मॉडेल राबवणार आहोत” असे आदित्य ठाकरे यांनी ‘द हिंदू’ शी बोलताना  सांगितले.

“वरळी कोळीवाडयात करोनाचे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर करोना बाधितांची संख्या २४ पर्यंत पोहोचली. अन्य २२ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळली नव्हती. पण आम्ही त्यांना शोधून काढले, त्यांची चाचणी केली व त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले. याचमुळे मागच्या ४८ तासात वरळी कोळीवाडा, आदर्श नगर आणि जनता कॉलनीमध्ये करोना बाधितांची संख्या कमी झाली. लोकांमध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसत नसतानाही, आम्ही त्यांची चाचणी करतोय” अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. करोना व्हायरस विरोधातील या लढाईत पुढचे दहा दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.