नितीन गडकरी यांच्याकडून मुनगंटीवार यांची पाठराखण
नागपूर : ‘टी १’ वाघीण नरभक्षक झाल्याने तिला नाईलाजाने मारावे लागले. यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काहीही दोष नाही. या मुद्यांवरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे आहे, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांची भक्कम पाठराखण केली.
आज शुक्रवारी नागपुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. यवतमाळ जिल्ह्य़ात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला ठार करण्यात आल्यावरून मुनगंटीवार यांना केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे. या पाश्र्वभूमीवर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ गडकरी पुढे आले आहेत.
त्यांनी आज एका पत्रकार परिषदेत राज्याच्या वनमंत्र्यांना वन्यजीवप्रेमी संबोधून क्लिन चीट दिली. त्यांनी १४ कोटी झाडे लावून जगात नाव केले आहे. त्यांच्यामुळे नागपूर जिल्हा टायगर कॅपिटल होत आहे. ती वाघीण नरभक्षक झाली होती. तिने यवतमाळ जिल्ह्य़ातील १३ जणांना जीव घेतला. या १३ जणांच्या कुटुंबांची दिवाळी कशी गेली, याबाबत एकही नेता बोलत नाही. नरभक्षक वाघिणीला ठार केले नसते तर तिने आणखी किती जणांचा बळी घेतला सांगता येत नाही. त्यामुळे तिला ठार करण्याशिवाय पर्याय नव्हता. जगात सर्वत्र अशीच पद्धत आहे. मात्र, काही राजकीय नेते उद्योगपतींच्या दबावामुळे वाघिणीला ठार करण्यात आल्याचा विचित्र आरोप करतात. यात काहीच तथ्य नाही, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 3:07 am