नांदेड दौऱ्यात आमदार अमिता चव्हाण, सावंत यांनी भेट घेतली

नांदेड : नागपूर-बुटीबोरी ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मावेजासंदर्भात निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यात काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला गुरुवारी यश आले. सरसकट मावेजा देण्याची खासदार अशोक चव्हाण यांची मागणी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे मान्य केली.

वरील महामार्गासह अन्य रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गुरुवारी मराठवाडय़ात आले होते. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात नांदेडपासून झाली. या दरम्यान भाजपचे सर्व प्रमुख नेते मुख्यमंत्री व गडकरी यांच्या स्वागतासाठी लोहा येथे ताटकळत थांबलेले असताना नांदेडमध्ये काँग्रेसच्या आमदार अमिता चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार डी. पी. सावंत, माजी आमदार रोहिदास चव्हाण तसेच नगरसेवक किशोर स्वामी यांनी नांदेड विमानतळावरच फडणवीस व गडकरी यांची भेट घेऊन मावेजासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी खा.अशोक चव्हाण यांनी गडकरी व फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहिले होते. त्या पत्रांच्या प्रती चव्हाण यांनी त्यांना सादर केल्या.  लोहा व परभणी येथील कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती; पण त्याआधी काँग्रेसच्याच नेतृत्वाला त्यांनी काही प्रश्नांच्या बाबतीत आश्वस्त केल्याची बाब आज येथे समोर आली. ३६१- बुटीबोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव लोहा ही तीन शहरे येतात. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमिनीचे संपादन करत असताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जमीनधारकांना कमी मोबदला मिळत आहे. ग्रामीण भागात संपादित होणाऱ्या जमिनीला सरसकट १०० टक्के मावेजा मिळत नाही आदी बाबी समोर आल्यानंतर मागील तीन-चार महिन्यांत या भागात मोठा असंतोष पसरला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रश्नावर आंदोलन करून जनजागृती केली; मात्र सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब हेरून काँग्रेस नेत्यांनी हा विषय हाती घेत अन्यायाकडे लक्ष वेधले. नांदेड विमानतळावरील चच्रेमध्ये गडकरी यांनी त्रुटी मान्य करून योग्य ती दुरुस्ती करण्याचे आश्वासन आमदार अमिता चव्हाण यांना दिले.