राज्यातील भाजप नेत्यांवर टीकेची एकही संधी न सोडणारी शिवसेना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीत मवाळ आहे का, असा प्रश्न रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात उपस्थित नागरिकांच्या मनात निर्माण झाला. त्याला निमित्त ठरले या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी गडकरी यांच्या कामाचे केलेले कौतुक.

नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोमवारी झाले. याप्रसंगी अ‍ॅड. परब यांनी मोकळया मनाने गडकरी यांच्या कामाचे कौतुक करीत राज्याच्या परिवहन विभागाच्या कामाला आणखी प्रभावी बनवण्यासाठी केंद्राकडून मदत आणि मार्गदर्शन मागितले. प्रतिउत्तरात गडकरी यांनीही अनिल परब यांच्या कामाची स्तुती करून परिवहन विभागाच्या कामात सुधारणांसाठी पूर्ण मदतीचे आश्वासन दिले.

गडकरी यांच्या आधी भाषणासाठी उभे राहिलेले परब म्हणाले, गडकरी यांच्या कामाची पद्धत आपण सर्वच ओळखून आहोत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी अनेक चांगले रस्ते बनवले. आता ते देशात गुळगुळीत रस्ते तयार करीत आहेत. आता राज्याच्या परिवहन मंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे की त्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित राहावी. यासाठी चांगले वाहनचालक तयार होणे, योग्य माणसांनाच वाहन परवाने मिळणे गरजेचे असून त्यासाठी राज्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी गडकरी यांनी केंद्राच्या निधीतून मदत करावी, अशी अपेक्षा परब यांनी व्यक्त केली.

प्रतिउत्तरात गडकरी म्हणाले, मी विधान परिषदेपासून परब यांचे काम पाहत आहे. आता परिवहन विभागातही परब चांगले काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात परिवहन विभागात चांगले बदल घडतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात अपघात घडविणारे हजारो ब्लॅक स्पॉट आहेत. २०२४ च्या आधी ते निम्याने कमी करायचे असून महाराष्ट्रात हे काम करण्यासाठी अनिल परब यांच्या मदतीची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची पद्धत आपण सर्वच ओळखून आहोत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी अनेक चांगले रस्ते बनवले. आता ते देशात गुळगुळीत रस्ते तयार करीत आहेत.    -अनिल परब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र