News Flash

देशातील ७० बेटं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित होणार

केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नितीन गडकरी

केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
देशातील १३ राज्यांना १४ हजार किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर २८० दीपगृह आणि १३०० लहान-मोठी बेटेदेखील आहेत. मात्र ही दीपगृहे आणि बेट आजवर दुर्लक्षित राहिली आहेत. यातील ७० बेट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली आहे. ते अलिबागजवळील कान्होजी आंग्रे बेटावर बांधण्यात येणाऱ्या प्रवासी जेटीच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
गेटपासून ९ नोटिकल मल अंतरावरील कान्होजी आंग्रे बेटावर उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता आ.जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाणे जिल्हय़ातील डहाणू येथे नौकानयन मंत्रालयाच्या माध्यमातून मोठे व्यापारी बंदर विकसित करण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित या कामाची सुरुवात केली जाणार आहे. देशातील सर्व लहान मोठी बंदरे रस्त्यांनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्पांसाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी राज्य सरकारला केली. फेब्रुवारी अखेपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. २०१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष असून यानिमित्ताने मुंबईलगतच्या समुद्रातील बेटांवर पर्यटन विकास कसा करता येईल तसेच या ठिकाणी सुरक्षेचा चोख बंदोबस्तही करण्याच्या अनुषंगाने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे नवे बंदर विकास धोरण तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या १५ दिवसांत ते मंत्रिमंडळासमोर मांडले जाणार आहे. व्यापार उद्योग, पर्यटन आणि जलप्रवासी वाहतुकीला चालना देण्याचा प्रयत्न असणार आहे, कोकण किनार पट्टीवरील बेट आणि लॅण्डिंग सेंटर्स सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे बेट विकसित करणे त्या ठिकाणी लोकांची वर्दळ वाढवणे, सीसीटीव्हीसारख्या सुरक्षाव्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी पावले उचलली जातील. जलवाहतुकीला चालना देण्यासाठी वेस्टर्न फ्रंटलाइनचा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येईल असेही ते म्हणाले.
पर्यटन हा जगभरात यशस्वी ठरलेला उद्योग आहे. यात रोजगाराच्या प्रचंड संधीदेखील आहेत. त्यामुळे कोकणात असे प्रकल्प उभारले गेले पाहिजेत, देशातील पहिला दीपगृह पर्यटन प्रकल्प रायगडमध्ये होत आहे. माझ्यासह तमाम रायगडकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी या वेळी बोलताना सांगितले.
काय आहे हा प्रकल्प
खंदेरी किल्ल्यावर नौकानयन मंत्रालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने दीपगृह पर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने १६ कोटी रुपये खर्चून प्रवासी जेटी बांधण्यात येणार आहे. किल्ल्याच्या दुरुस्तीबरोबरच बेटावर १८ एकर परिसरात पर्यटन सुविधा केंद्र, प्रवासी निवास सुविधा, स्विस कॉटेजेस, लाइट अ‍ॅण्ड साऊंण्ड शो, लहान सभागृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. एमटीडीसीच्या माध्यमातून गेट वे ते कान्होजी आंग्रे बेट या दरम्यान जलप्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:32 am

Web Title: nitin gadkari talk about tourism in alibaug
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज – रवींद्र सावळकर
2 राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन सावंतवाडीत
3 आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
Just Now!
X