– संदीप आचार्य

मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सरकारची स्थिती अनिर्णायकी आहे. मंत्रिमंडळातील मंत्री काय करतात याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्ता नसतो तर मुख्यमंत्री काय सांगतात त्याकडे मंत्र्यांचे लक्ष नसते, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण जास्त आहेत. मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी समन्वयातून काम होणे गरजेचे असते. आज डॉक्टर व परिचारिकांना करोना संरक्षित पुरेसे ड्रेस नाहीत. त्यांना सकस आहार दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. मुंबईतील वोकहार्ट रुग्णालय बंद केले जाते. अनेक रुग्णालये परिचारिका व कर्मचार्यांना करोनाची लागण झाल्याने बंद होत आहेत. खासगी डॉक्टरांना दवाखाने उघडे ठेवण्याबाबत सक्ती केली जाते मात्र त्यांना मास्क अथवा आवश्यक सुरक्षा साहित्य कोण देणार वा कुठे मिळेल तसेच त्यांनी रुग्ण तपासताना कोणती काळजी घ्यायची याची कोणतही माहिती दिली जात नाही.

राज्यातील मंत्री रोज नवे शासन आदेश जारी करतात मात्र या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जाते का हे कोणी तपासायचे असा सवाल करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक शासन आदेश केवळ कागदावरच निघाले आहेत. सध्या मी रोज राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील साडेचार हजार लोकांशी संपर्क साधून माहिती घेत असतो तेव्हा अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येतात. प्रामुख्याने ग्रामीण भागातील आरोग्यसेवा करोनाच्या पार्श्वभूमीवर पोरकी झाल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडूनच ऐकायला मिळत आहेत. करोनाबाबत ठोस धोरण दिसत नाही. कोणते प्रोटोकॉल सरकारने जाहीर न केल्यामुळे डॉक्टरांमध्येही गोंधळ दिसतो.

खरंतर एवढ्या दिवसात सरकारवर कोणीही टीका केलेली नाही. विरोधी पक्ष म्हणून आमचीही सहकार्याचीच भूमिका राहिली आहे. अशावेळी सरकारने पटापट निर्णय घेणे आवश्यक असताना आताही राज्यात अनिर्णायकी स्थिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री वेगवेगळे आदेश काढत आहेत मात्र त्याची अंमलबजावणीच होताना दिसत नाही.

आरोग्य सेवक व पोलिस हे आज करोनाच्या आजाराशी खर्या अर्थाने लढत असताना त्यांचा पगार का कापण्यात आला असा सवाल करून फडणवीस म्हणाले,देशातील कोणत्याच राज्याने पोलीस व आरोग्य सेवकांचा पगार कापलेला नाही. मंत्री व मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याने उच्चपदस्थ अधिकारीही भांडत असल्यासारखे वागत आहेत. काही अधिकारी ही संधी साधून आपला हिषेब चुकवू पाहात आहेत, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने पुरेसे धान्य पाठवूनही आज रेशन दुकानात लोकांना धान्य मिळत नाही. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत केशरी शिधापत्रिका असलेल्यांना धान्य देण्याचा निर्णय घेतला. आज राज्यात लाखे स्थलांतरित आहेत ज्यांच्याकडे कोणतीच शिधापत्रिका नाही. अशांनाही खरेतर रेशन दुकानात धान्य दिले पाहिजे. १६ राज्यात आज शिधापत्रिका नसली तरी धान्य दिले जात आहे. आपल्यापेक्षा छोटी राज्यही आज करोनाच्या लढाईत रेशन दुकानावर सर्वांना धान्य देण्याचा निर्णय घेतात आणि केंद्राने पुरेसे धन्य दिलेले असतानाही आज रेशनवर धान्य मिळत नाही. स्थलांतरितांनाही रेशनवर धान्य दिले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले. करोनाच्या लढाईत काही मंत्री केवळ केंद्रावर टीका करून प्रसिद्ध घेण्याचे काम करत आहेत. सरकार रोजच्या रोज आदेश काढण्याचे काम करत असले तरी जमिनीवर कृती काय होते ते महत्वाचे असल्याचा टोलाही फडणवीस यांनी हाणला.

राज्यात सर्वाधिक उद्योग असताना आपण उद्योगांना हातशी धरून करोना संरक्षित ड्रेस, मास्क तसेच आवश्यक गोष्टी का करू शकत नाही, असा सवाल करतांना वोकहार्ट सारखी अन्य हॉस्पिटल बाधित झाली तर उद्या आपली स्थिती इटालीसारखी होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. एवढ्या उशिराने म्हणजे हजाराहून अधिक करोना बाधित लोक झाल्यानंतर जागे झालेल्या सरकारने करोना सल्लागार म्हणून माजी आरोग्य महासंचालक डॉ सुभाष साळुंखे यांची आज नेमणूक केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांशी संबंधित असलेल्या डॉ साळुंखे यांची एवढ्या उशीराने का, नेमणूक केली असा सवाल करत करोना रुग्णांबाबत ठोस धोरण नसल्याचे फडणवीस म्हणाले. करोनाची लढाई आपल्या सर्वांचीच असल्याने आजपर्यंत आम्ही कोणतीही टीका केली नाही. परंतु ठोस निर्णय होणार नसतील तसेच काढलेले आदेश केवळ कागदावर राहात असल्यामुळे लोकांना त्रास होणार असेल तर आम्हाला आवाज उठवावाच लागेल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना केंद्र व राज्य यांनी चर्चा केली पाहिजे. आजची परिस्थिती पाहाता मुंबई- पुणे तसेच एमएमआर विभागात अजूनही काहीकाळ लॉक डाऊन करावा लागेल, असेही ते म्हणाले.