रोज माझ्या आढावा बैठका सुरू आहेत, जी माहिती हवी आहे ती माहिती मी घेतो आहे. याचप्रमाणे आज जी आढावा बैठक झाली त्यात कोणत्याही विकासकामांना स्थगिती देण्यात आलेली नाही किंवा कोणतीही कामं रद्द करण्यात आलेली नाही.  उलट ही कामं अधिक गतीने कशी होतील याकडे आम्ही लक्ष देत आहोत. यात देखील प्राधान्यक्रम ठरवून यापुढील वाटचाल होईल. राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीद्वारे आढावा घेतला, सुमारे चार तास ही बैठक चालली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना  ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकासकामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण राज्यभर जी विकास कामं सुरू आहेत त्यांना कोणीही स्थिगिती दिलेली नाही किंवा रद्द देखील केलेली नाहीत. या कामांची माहिती घेणे गरेजेचे आहे. उलट सुरू आहे ती कामे अधिक गतीने कशी पुढे नेता येईल आणखी विविध कामे जी आम्हाला करायची आहेत ती यामध्ये कशी सामवता येईल, याकडे आमचे लक्ष आहे. तर बुलेट ट्रेन संदर्भात अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भीमा कोरेगावच्याबाबतीत पहिल्या सरकारने जे आदेश दिलेले आहेत, त्यांची अंमलबजावणी झाली की नाही? हे पाहण्यास मी सांगितले आहे.  ज्यांच्यावर गंभीरस्वरूपाचे गुन्हे नाहीत, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मागील सरकारने दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी झालेली आहे की नाही, हे तपासण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत, असे देखील मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.