पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांनी ओरोस येथे स्पष्ट केले. कुणी गुंडगिरी व अन्य मार्गाचा स्वीकार करतो पण राष्ट्रवादी काँग्रेस विधायक कार्याला सहकार्य करते, कुणाचे चुकले तर समजून सांगू, असे प्रतिपादन ना. पवार यांनी लोकसभा निवडणूक पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केले.
सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे शरद कृषी भवन या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ना. शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष आम. विद्या चव्हाण, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री श्रीमती स्वप्नगंधा कुलकर्णी, उदय सामंत, भवन ट्रस्टचे अध्यक्ष विक्रमसिंह पाटणकर, आम. निरंजन डावखरे, आम. किरण पावसकर, उद्योजक अविनाश चमणकर, माजी आमदार शिवराम दळवी, आम. विजय सावंत, कोकण सिंचन महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, अबीद नाईक, प्रसाद रेगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सहकार महर्षी स्व. शिवराम भाऊ जाधव व आमदार स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांचे स्मरण या प्रसंगी शरद पवार यांनी केले, ते म्हणाले, या कृषी भवनाच्या माध्यमातून कृषी व मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळायला हवे. आज अनेक प्रश्न निर्माण जाले असले तरी या वास्तुत आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशा सेवा उपलब्ध करून द्यायला हव्यात.
कृषी विद्यापीठ वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र आणि कृषी भवनाने लोकांना विश्वासात घेऊन कृषी विषयक प्रश्न मार्गी लावा, तसेच ५० एकरमध्ये फळबाग आणि २५ एकरमध्ये कोळंबी मत्स्यविकास प्रकल्प मार्गी लावून कृषी भवनाचे काम चालविणे आवश्यक आहे. त्यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, संशोधन व उत्पन्न याची जोड मिळेल असा विश्वास ना. शरद पवार यांनी व्यक्त केला. येत्या दीड वर्षांत दोन्ही प्रकल्प राबवून कृषी भवनाची लोकप्रियता वाढवा, असे आवाहन त्यांनी केले.
आंबा युरोप खंडात नाकारला गेला, त्यावर बोलताना ना. पवार म्हणाले, आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी युरोप खंडात निर्माण होणाऱ्या प्रत्येक कृषी उत्पादनाच्या बाबत काळजी घ्यायला हवी. त्यासाठी फळप्रक्रिया केंद्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी पॅकेजिंग हाऊस उभारण्याची गरज आहे. या दोन गरजांची काळजी घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.
भारत देश अन्नधान्य उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा मानकरी बनला आहे. यंदा २६४.३७ दशलक्ष टन धान्य भारतात पिकविले गेल्याचे सांगून फळझाड व फळनिर्मितीत भारत आघाडीवर आहे असे सांगताना मत्स्यव्यवसायात कोळंबी उत्पादनात आघाडी घ्यावी लागेल, असे पवार म्हणाले.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबा भाव कसे काय कोसळले त्याची चौकशी केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळावेत असे सांगून शरद कृषी भवनाचे सर्वानी पावित्र्य राखा, असे आवाहन केले. सिंधुदुर्गनगरी येथील ४० गुंठे जमिनीत राष्ट्रवादी भवन उभारण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
या वेळी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, स्वप्नगंधा गुरुनाथ कुलकर्णी, आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. आमदार कै. गुरुनाथ कुलकर्णी यांचे शरद कृषी भवनाचे स्वप्न साकारल्याचा सर्वानीच आवर्जून उल्लेख केला. त्या वेळी त्यांच्या पत्नी स्वप्नगंधा कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी पत्रकार महेंद्र पराडकर व विजय गावकर यांना गुरुकुल पुरस्काराने शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या भवनाच्या उभारणीत सहभाग घेणाऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. आभार जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांनी मानले.