मध्य व पश्चिम रेल्वेकडून २६० विशेष गाडय़ा

दरवर्षी कोकणासाठी विशेष गाडय़ा सोडणाऱ्या रेल्वेने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४४ जादा गाडय़ा सोडल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अल्प दिलासा मिळाला आहे. मात्र यंदा सोडण्यात आलेल्या विशेष गाडय़ांमध्ये एकही गाडी कोकण रेल्वेतर्फे सोडण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत कोकणासाठी गाडी सोडण्याबाबत उदासीन असलेल्या पश्चिम रेल्वेनेही यंदा ६४ विशेष गाडय़ा सोडत आपला वाटा उचलला आहे. मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची संख्या २६० एवढी प्रचंड असल्याने कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गावर ताण येणार आहे.
यंदा गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने २०६ विशेष गाडय़ा सोडल्या आहेत. यात पनवेल-चिपळूण या डेमू सेवेचाही समावेश आहे. या गाडीमुळे यंदा तळकोकणाऐवजी चिपळूण-खेड येथे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी बसगाडय़ा किंवा जास्त गर्दीच्या गाडय़ांऐवजी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबरोबरच मडगाव, रत्नागिरी, करमाळी येथे जाण्यासाठी दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून तब्बल २०६ गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. दरवर्षी कोकण रेल्वे किमान दहा विशेष गाडय़ांची घोषणा करते. यंदा एकही गाडी न सोडल्याने आश्चर्य व्यक्त करत आहेत. याबाबत कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी संकेतस्थळावर माहिती टाकली असल्याचे सांगितले.