केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरायचे कसे, या चिंतेत असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. बोर्डाच्या परीक्षेचे आधी फॉर्म भरा आणि नंतर पैसे जमा करा, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे. नोटबंदीचा विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वसामान्य जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर रांगांमध्ये तासनतास उभे राहत आहेत. अनेकांना दैनंदिन व्यवहारात अडचणी निर्माण होत आहेत. अनेकांना दैनंदिन खर्चासाठी लागणाऱ्या पैशांची चिंता सतावत असतानाच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही आता फॉर्म भरायचे कसे, अशी चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांवर या गोष्टीचा परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाचे फॉर्म भरावेत, त्यानंतर पैसे जमा करावेत, असे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील पुढील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

नाट्यगृहांमध्येही जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश

नोटबंदीचा फटका मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीलाही बसल्याचे बोलले जात आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक मराठी नाटकांचे प्रयोग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने नाट्यसृष्टीचा आर्थिक डोलारा कोसळण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. तसेच चलनाअभावी प्रेक्षकांनीही नाट्यगृहांकडे पाठ फिरवली होती. पण आता नाट्यगृहांनी जुन्या नोटा स्वीकाराव्यात, असे आदेशच शालेय शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. तावडेंनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर नाट्यसृष्टी आणि नाट्यरसिकांनाही दिलासा मिळाला आहे.