मुंबईसह १० महापालिकांमध्ये २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारीला सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातो आहे. मात्र महापालिका निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असायला हवे आणि मतदारयादीतील नाव शोधणे अतिशय किचकट असते. मात्र आता मतदारयादीतील नाव एका क्लिकवर तपासता येणार आहे.

इनटच अॅप या संपर्क व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीने मतदार यादीतील नाव तपासून पाहण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. ०२२३०७७०१६५ या क्रमांकावर कॉल केल्यास मतदाराच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. या मेसेजमध्ये एक लिंक असते. या लिंकवर क्लिक केल्यावर इन टचचे संकेतस्थळ सुरु होते. यानंतर मतदारांना २१ फेब्रुवारीला निवडणूक असलेल्या महानगरपालिकांची यादी दिसते. यानंतर मतदाराने आपल्या शहरावर क्लिक केल्यावर आपले संपूर्ण नाव दिलेल्या चौकटीत भरल्यावर त्याला त्याचे नाव नेमक्या कोणत्या मतदारयादीत आहे, याची माहिती दिसू लागते. विशेष म्हणजे एका क्लिकवर मतदारसंघाचा क्रमांक, मतदान ओळखपत्र क्रमांक, प्रभाग क्रमांक, प्रभागाचे नाव आणि मतदान केंद्र अशी मतदारयादीतील संपूर्ण माहिती मोबाईलवर मेसेजच्या रुपात पाठवली जाते. टोल फ्री क्रमांकासोबतच https://www.intouchapp.com/pledgetovote या लिंकवर जाऊनही मतदार त्यांची मतदारयादीतील माहिती पाहू शकतात.

इनटच अॅपकडून सीएसआरच्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आहे. त्यामुळे ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. मतदार ज्यावेळी ०२२३०७७०१६५ हा टोल फ्री क्रमांक असल्याने त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यानंतर इनटचकडून लिंकसाठी पाठवण्यात येणारा मेसेज आणि मतदारयादीसंबंधीची संपूर्ण माहितीचा मेसेजदेखील निशुल्क पाठवला जातो. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी इनटच अॅपतर्फे ‘प्लेज टू वोट’ उपक्रम राबवण्यात येतो आहे. मतदारयादीतील नाव शोधण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवू नये, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. मतदारयादीतील संपूर्ण माहिती पुरवण्यासोबतच इनटचकडून मतदारांना २१ फेब्रुवारीला मतदान करण्याची आठवण करुन देणारा मेसेजदेखील पाठवला जाणार आहे.

मतदारयादीतील संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवण्यासाठी ०२२३०७७०१६५ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती या शहरांची नावे मतदारांना दिसतील. त्यामुळे या शहरात राहणारे मतदार मतदारयादीतील संपूर्ण माहिती त्यांच्या मोबाईलवर मिळवू शकतात. मुंबईतील मतदारांसाठी ०२२३०७७०१६५ या टोल फ्री क्रमांकासोबतच ०२२३९६५९४९४ हा क्रमांकदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.