तीन दशकांपासून २००७ च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ मधील मोदी लाटेत भाजपचे ए. टी. पाटील हे सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आले. यंदा ‘हॅट्ट्रिक’ साधण्यासाठी त्यांनी कंबर कसली असताना मतदारसंघात त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचे भांडवल विरोधी पक्षांसह त्यांच्याच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी सुरू केल्यामुळे पाटील यांची वाट बिकट मानली जात आहे. युतीचा विषय अधांतरी असल्याने शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांनीही जय्यत तयारी सुरू केली असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

गत पंचवार्षिकला भाजपतर्फे ए. टी. पाटील आणि राष्ट्रवादीतर्फे डॉ. सतीश पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्या वेळी ए. टी. यांच्यावर पक्षातील कार्यकर्त्यांसह मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची प्रचंड नाराजी होती. याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र निकाल लागल्यानंतर त्यांना तब्बल सहा लाख ४७ हजार ७७३, तर राष्ट्रवादीचे डॉ. पाटील यांना दोन लाख ६४ हजार ८३८ मते पडली. अर्थात यास मोदी लाटेचा मोठा वाटा होताच. पाच वर्षांनंतर पुन्हा पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारीचा दावा केला आहे. जलद रेल्वे गाडय़ांना पाचोरा, चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर थांबा, रस्ते विकास आणि चौपदरीकरण यासह स्थानिक पातळीवर केलेली विकासकामे विद्यमान खासदारांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र राज्य आणि केंद्रात सत्ता असताना मतदारसंघातील पिण्याच्या, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. देशातील दुसरा अभिनव प्रकल्प असलेल्या गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांची केवळ चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने खासदार पाटील यांनी काहीही केले नाही, अशी नाराजी तसेच पाडळसे धरणाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम, वाघूर धरणातून शेतीपर्यंत जलवाहिनी, विमानतळ असतांना बंद पडलेली विमान सेवा यासारखे अनेक प्रश्न भाजपसमोर मोठी आव्हाने ठरत आहेत. त्यातच माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे अडचणीत अधिक भर पडू शकते.

जातीय समीकरणांचा विचार केल्यास मतदारसंघात मराठा समाज निर्णायक असल्याने ए. टी. पाटील यांच्यासाठी ती जमेची बाजू असली तरी या वेळी भाजपतूनच त्यांना आव्हान दिले जात आहे. सलग दोन पंचवार्षिक ते निवडून आल्याने त्यांच्याबद्दलची वाढती नाराजी, पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणावरून त्यांच्याविरुद्धच्या अंतर्गत तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर, आगामी वाट बिकट असल्याची जाणीव त्यांनादेखील आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद दुर्लक्षित करुन चालणार नाही.

पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याशी खासदारांचे पटत नाही. पारोळ्याचे सेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील हे देखील मागील निवडणुकीतील पराभवासाठी खासदार पाटील यांना दोषी मानतात. अशा अनेक गोष्टी भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

ए. टी. पाटील यांच्याबद्दलच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनीदेखील लोकसभा लढविण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्याआधी भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे नाव अचानक पुढे करीत नवी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फुसका बार ठरला. या मतदारसंघातून शरद पवार यांनी राष्ट्रवादीतर्फे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासाठी आग्रह धरला, परंतु देवकर लोकसभेसाठी इच्छुक नसल्याने अनिल पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

विधानसभेचे राजकीय चित्र

चाळीसगाव भाजप

पाचोरा शिवसेना

एरंडोल  राष्ट्रवादी

अमळनेर अपक्ष

जळगाव ग्रामीण  शिवसेना

जळगाव शहर    भाजप

दहा वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे मतदारांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हेच विरोधकांना खुपत आहे. यामुळे त्यांनी आपली बदनामी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या पंचवार्षिकला अशीच परिस्थिती असताना मतदारांनी विक्रमी मतांनी निवडून दिले. यंदाही विजय भाजपचाच होईल. आमच्यात पक्षांतर्गत मतभेद नाहीत. विरोधकांकडे उमेदवारदेखील नसल्याने सध्या ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.

– ए. टी. पाटील, खासदार (भाजप)

सलग १० वर्षे खासदारकी असतांना ए. टी. पाटील यांनी काय केले, याची जाणीव त्यांनादेखील आहे. ते त्यांचेच नेते, कार्यकर्त्यांना नकोसे झाले आहेत. गतवेळी मोदी लाटेत ते निवडून आले. यंदा ती लाट ओसरली असल्याने आपले काय होईल, अशी भीती त्यांना सतावत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे अनेक तुल्यबळ उमेदवार आहेत. इच्छुकांच्या वरिष्ठ नेत्यांनी मुलाखती घेतल्या असून पक्ष जो उमेदवार देईल, त्यास आम्ही निवडून आणू.

– आ. डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी (मागील निवडणुकीतील उमेदवार)