पावसाची उघडीप; राज्यभरातील पारा ३० अंशांपुढे

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप घेतली असल्याने सर्वत्र कोरडे आणि अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पावसाच्या सप्टेंबर महिन्यामध्येच नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव मिळतो आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्याने पुढील काही दिवस पावसाची उघडीप कायम राहणार आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकणासह काही ठिकाणी मात्र किरकोळ स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. कोकण आणि घाटमाथ्यासह विदर्भात या दरम्यान काही ठिकाणी पाऊस झाला. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरडे हवामान आहे. कमी दाबाच्या पट्टय़ाबाबत अद्यापही काही संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाची विश्रांती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. पावसाची उघडीप आणि कोरडय़ा हवामानामुळे सध्या राज्यातील कमाल तापमानात वाढ होत आहे. २५ ते २६ अंशांच्या आसपास असलेले कमाल तापमान सध्या ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात घामाघूम होण्याची वेळ आली आहे.

मराठवाडय़ात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहणार आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी किरकोळ पाऊस होऊ शकतो. मात्र, तापमानामध्ये आणखी १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रिय होईपर्यंत उकाडा वाढत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील चोवीस तासांमध्ये मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर आणि घाटमाथा परिसरात पावसाने हजेरी लावल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

कमाल तापमानाचा वाढलेला पारा

सोमवारी राज्यामध्ये सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ३५.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. इतर प्रमुख ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढील प्रमाणे- चंद्रपूर ३४.८, वर्धा ३४, अकोला ३३.३, नागपूर ३३.३, जळगाव ३३, परभणी ३२.४, अमरावती ३२.४, अलिबाग ३२.२, मुंबई ३२, यवतमाळ ३२, औरंगाबाद ३१.८, मालेगाव ३१.६, म्डहाणू ३१.४, सातारा ३०.७, पुणे ३०, कोल्हापूर २९.६, नाशिक २८.७