जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील दलित हत्याकांडातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने आंदोलनाचा आता भडका उडू लागला आहे. विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली. रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मानवता जनआंदोलनाच्या वतीने काळ्या फिती लावून मुक मोर्चा काढण्यात आला तर जातीय अत्याचार संघर्ष समितीचे धरणे आंदोलन दिवसभर सुरुच होते.
पंधरा दिवसानंतरही जवखेडे खालसा येथील दलित हत्याकांडातील आरोपी पकडले गेलेले नाहीत. त्यामुळे आंदोलने तीव्र होऊ लागली आहेत. दुपारी रिपब्लिकन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हस्के यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा केलेला प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. म्हस्के यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी हवालदार विकास खंडागळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते विनित पाडळे, अंकुश भोरे, सचिन उमाप, सचिन बावणे, बाळ भोंबळ, भीम वाकचौरे, सुमित पाडळे आदींची पोलिसांशी झटापट झाली.
तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी मानवता जन अांदोलनाच्या वतीने काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणेही धरण्यात आली. विजय पाथरे, अ‍ॅड. भानुदास होले, प्रमिला जगताप, प्रमोद वाघमारे, अशोक सोनवणे, संगीता गाडे, विमल जगताप आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, कॉ. बाबा आरगडे, माधव बावगे, कृष्णा चांदगुडे, अमीर शेख आदींनी हत्याकांडाचा निषेध करणारे व आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. घटनेच्या तपासात राजकीय दबाव आहे का, असाही प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीचे धरणे आंदोलनही गेल्या तीन दिवसांपासुन सुरु आहेत. आजही दिवसभर या आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा दिला. सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत धरणे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले.