लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : जिल्ह्यात करोनामुळे रुग्ण वाढ व मृत्यूचे सत्र कायम आहे. आणखी एका रुग्णाचा मृत्यू, तर ४७ नवे रुग्ण रविवारी आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १०२ रुग्ण दगावले आहेत. एकूण रुग्ण संख्या २१३४ वर पोहोचली. दरम्यान, आज ४७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात करोनाचा प्रकोप सुरूच आहे. अकोट, मूर्तिजापूर शहरासह ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वेगाने पसरतो आहे. रुग्णांसोबतच मृत्यूचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक ठरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण २८२ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २३५ अहवाल नकारात्मक, तर ४७ अहवाल सकारात्मक आले आहेत. काल रात्री रॅपिड टेस्टमध्ये २२ जणांचे अहवाल सकारात्मक आले. आतापर्यंत रॅपिड टेस्टच्या माध्यमातून १२० रुग्ण आढळून आले आहेत. याचाही समावेश एकूण रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. सध्या ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल रात्री एक जणाचा मृत्यू झाला. ६० वर्षीय पुरुष रुग्ण मूर्तिजापूर येथील रहिवासी होते. त्यांना १६ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना काल रात्री ते दगावले आहेत.

आज सकाळी ३८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात १६ महिला व २२ पुरुष आहेत. त्यामध्ये अकोट येथील ३३ जण, मूर्तिजापूर तीन जण तर अकोला शहरातील जुना तारफैल व रामनगर भागातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी आणखी नऊ जणांची भर पडली. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत. त्यामध्ये आठ जण मूर्तिजापूर, तर एक जण अकोला शहरातील दगडी पूल येथील रहिवासी आहे. आज दुपारनंतर शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून आठ, कोविड केअर केंद्रामधून ३१, खासगी रुग्णालय व हॉटेलमधून आठ असे एकूण ४७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यातील मृत्यूदर ४.७३ टक्के
अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज आणखी एका मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत १०२ रुग्णांचा बळी गेला असून त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनामुळे मृत्यूचा दर ४.७३ टक्के आहे. राज्याच्या तुलनेत तो अधिक आहे.