८३ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून मंजुरीविना

सामाजिक न्याय विभागाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (ई शिष्यवृत्ती) योजनेअंतर्गत नाशिक विभागातील महाविद्यालयांनी एकूण तीन लाख १२ हजार ८४६ पैकी ८३ हजार ३३३ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित ठेवले आहेत. अशा महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ समाजकल्याणच्या संबंधित साहाय्यक आयुक्तांकडे पाठविण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे यांनी केले आहे.

विभागाने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण परीक्षा शुल्क योजना २०११-१२ या वर्षांपासून ऑनलाइन राबविण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइनमुळे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होत आहे. शासन स्तरावरून ऑनलाइन अर्ज त्वरित निकाली काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. विभागातील महाविद्यालयांना समाजकल्याणच्या साहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांनी प्रलंबित असलेले अर्ज मंजुरीसाठी सादर केलेले नाहीत.

महाविद्यालयांनी नवीन विद्यार्थ्यांचीही तत्काळ नोंदणी करून घ्यावी. तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेतील वैयक्तिक खाते आधार क्रमांकाशी जोडणी करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्यातून किमान तीन महिन्यांतून एकदा तरी व्यवहार करावा. अन्यथा बँक खाते गोठविण्यात येते. त्यामुळे आपली शिष्यवृत्ती खात्यात जमा न होता समाजकल्याण विभागाकडे परत जाते. ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधार क्रमांक काढले नसतील त्यांच्यासाठी महाविद्यालयांनी शिबीर आयोजित करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्राचार्याचे दुर्लक्ष

विभागात नाशिक जिल्ह्य़ात १८ हजार ४८५, धुळे सात हजार ८७९, नंदुरबार एक हजार ४८०, जळगाव २७ हजार ८०४ आणि नगर जिल्ह्य़ात २७ हजार ६८५ मागास विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. वारंवार सूचित करूनही महाविद्यालय स्तरावरील अर्ज मंजुरीसाठी साहाय्यक आयुक्तांकडे पाठविण्यात प्राचार्यानी दुर्लक्ष केले आहे. प्राचार्यानी मागास विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेवू नयेत, असे आवाहन गवळे यांनी केले आहे.

प्रलंबित अर्ज

  • ’ नाशिक : १८ हजार ४८५
  • ’ धुळे : ७ हजार ८७९
  • ’ नंदुरबार : एक हजार ४८०
  • ’ जळगाव : २७ हजार ८०४
  • ’ नगर : २७ हजार ६८५