करोनाची तीव्र स्वरुपाची लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणा-या पॅकेजेसमध्ये लाभ घेता येत नाही. अशा रुग्णांकडून उपचारासाठी घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दर निश्चित केले आहेत. बेड चार्ज, जेवण, औषधी यासाठी प्रती दिवस जास्तीत-जास्त ७०० रुपये या दराने शुल्क आकारण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने कोविड-१९ साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत ३१ जुलै पर्यंत उपलब्ध करुन देण्याबाबत २३ मे रोजी शासन निर्णय जारी केला आहे. योजनेचा लाभ घेण्याकरता उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ सदर व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात कोविड-१९ चा संसर्ग झालेले करोना रुग्ण कस्तुरबा गांधी हॉस्पीटल, सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे भरती करण्यात येतात. कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी ही दोन्ही रुग्णालये ही योजना राबविण्यास पात्र आहेत.

आणखी वाचा- तुकाराम मुंढेंचा दणका, कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

तथापी, बरेचशे रुग्ण ज्यांना करोनाची तीव्र स्वरुपाची लक्षणे नसतात किंवा सौम्य लक्षणे असतात ते महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत येणा-या पॅकेजेसमध्ये लाभ घेण्यास पात्र ठरत नाही. यामुळे अशा रुग्णांकडून किती उपचार शुल्क आकारावे याबाबत नियम करणे आवश्यक होते.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी, कोविड-१९ चे बाधीत रुग्ण जे महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत येणा-या पॅकेजेसमध्ये लाभास पात्र नाही, अशा रुग्णांकरता रुग्णालयांनी प्रती दिवस जास्तीत-जास्त ७०० रुपये या दराने शुल्क आकारण्या बाबत आदेश दिले आहेत. यामध्ये बेड चार्ज, जेवण, औषधी व इतर उपचार यांचा समावेश राहील. कोविड तपासणी करीता ज्या किट प्रशासनामार्फत मोफत पुरविल्या जातील अशा कीटचा उपयोग ICMR च्या निकषानुसार करावायाच्या चाचण्यांकरीता करण्यात यावा, यासाठी रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. तसेच, अल्प उत्पन्न गटातून येणाऱ्या रुग्णांसाठी आणि धर्मदाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार १० टक्के बेड हे अत्यल्प उत्पन्न गटातील रुग्णांकरिता राखीव ठेऊन त्यांना नि:शुल्क बेड उपलब्ध करुन द्यावेत.

आणखी वाचा- पालघर: शासकीय व्यवस्थेला सहकार्य न केल्यानं चिंचणी ग्रामस्थावर होणार गुन्हा दाखल

केवळ सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्याबाबतचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेतील व ज्यांना दहा दिवसाच्या आधी सुट्टी दिली असेल त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठवण्यात यावे.या ठिकाणी कोणतेही शुल्क लागणार नसल्याचे स्पष्ट केले आले आहे