वादळ वाऱ्यासह पाऊसाची हजेरी * पेरणी, भात लागवडीच्या कामाला सुरुवात

डहाणू  : शुक्रवारपासून   रिमझिम  पावसाने  सुरुवात केल्यानंतर पालघर जिल्हयात पावसाअभावी रखडलेल्या भातशेतीच्या   पेरणीच्या कामाला सुरुवात झाल्याने  शेतकरी  सुखावला आहे. पेरणीसाठी खोळंबलेले शेतकरी वर्गाला रविवारपासून  दिलासा  मिळाला आहे.

डहाणू, आशागड, आसवे, जामशेत, आंबेसरी, कासा, धुंदलवाडी, वाणगाव, एना, दाभोण, साखरा, चिंचणी, वरोर, वासगाव, देदाळे, आसनगाव, सायवन, वेती—वरोती, सुखंडआंबा, कोसबाड, नागझरी, आंबोली, हळदपाडा, मोडगाव, रायपूर,  आंबेसरी, झरी, सारणी, तवा, वधना, दापचरी, बोर्डी  या परिसरात पेरणीच्या कामाला शेतकरी लागले.

डहाणू समुद्रकिनाऱ्यावरही जोरदार पावसासह  समुद्राला उधाण आल्याने किनारपट्टीच्या भागात रहिवाशांनी भीतीचा अनुभव घेतला. कधी हलक्या सरी तर कधी जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे नाले, ओहोळ, नदी भरून वाहू लागले.

डहाणू खाडी, आगर , चिखले, नरपड या भागात  जोरदार पावसासोबत समुद्रातील लाटा मुसंडी मारत होत्या. आज पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार धडक दिल्याने किनारपट्टीला अक्षरश: झोडपून काढले. पावसाच्या या हजेरीमुळे  वातावरणात गारवा आला आहे.

 

वसई : मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येईल की काय, या विवंचनेत शेतकरी बांधव चिंतेत होते. अखेर शुक्रवारपासून वसईसह पालघर जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वसई तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पावसानेही दोनचार दिवस चांगला जोर ठेवल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व इतर शेतीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती.

दुसरीकडे तयार झालेली भाताची छोटी रोपेही करपून जाण्याची भीती होती. आणखी जर आणखी काही दिवस पाऊस पडला नसता तर हंगामच वाया गेला असता. परंतु शुक्रवारपासून सुरू झालेला पाऊस मागील  तीन-चार दिवसांपासून चांगल्या प्रकारे कोसळू लागला आहे. त्यामुळे वसईसह विविध ठिकाणच्या भागांतील शेतकऱ्यांनी शेतातील भाताची रोपे खणून त्याची योग्यरीत्या लागवड करण्यास सुरुवात केली आहे. या वातावरणामुळे शेतकरी सुखावला आहे.