News Flash

खवल्या मांजराच्या तस्करीत आणि शिकारीच्या प्रमाणात मोठी वाढ

वाघापेक्षाही खवले मांजराची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते अशी शक्यता आहे

खवल्या मांजराच्या तस्करीत आणि शिकारीच्या प्रमाणात मोठी वाढ

धवल कुलकर्णी 

भारतातच काय पण जगात कोणत्या वन्यप्राण्यांची किंवा त्याच्या अवयवांची सर्वाधिक तस्करी होते असा प्रश्न विचारला तर कदाचित बहुतेक लोक वाघाचं नाव घेतील. परंतु वनखात्याच्या अधिकाऱ्यांना आणि वन्य गुन्ह्याची उकल करणाऱ्या यंत्रणांना काहीतरी वेगळाच संशय आहे. त्यांच्या मते ज्या प्राण्याची सर्वाधिक तस्करी किंवा शिकार केली जाते तो वाघ नसून एक निशाचर आणि कीटक खाणारा असा एक छोटा प्राणी आहे. त्याचं नाव आहे खवल्या मांजर उर्फ पंगोलीन…

जमिनीत खड्डे करून राहणाऱ्या या प्राण्यांना शिकारी त्यांच्या वेळामध्ये दूर सोडून किंवा उकरून पकडतात. असा गैरसमज आहे की या प्राण्याचे रक्त व खवल्यांचा वापर हा काही औषध बनवण्यासाठी केला जातो. परंतु वैद्यक शास्त्रामध्ये अजून पर्यंत याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. खवल्या मांजराच्या खवल्यांना तर अगदी चीन, व्हिएतनाम आणि पूर्वोत्तर देशांमध्येही मागणी आहे. खवल्या मांजर हे महाराष्ट्रात जवळजवळ सर्वत्र आढळत असल्यामुळे महाराष्ट्रातून त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असावी असा संशय व्यक्त केला जातो.

मागच्या महिन्यात कोल्हापूर वनवृत्ताच्या अधिकाऱ्यांनी अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला या गुन्ह्यांमध्ये गुंतलेली मंडळी यांचे लागेबांधे अंतरराष्ट्रीय टोळ्यांशी किंवा तस्करांशी असावेत असा अंदाज आहे. वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी सांगितले, “कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही टोळ्या खवले मांजर, मांडूळ साप, कासव, घुबड यांसारख्या वन्य प्राण्यांची तस्करी करत आहेत. या प्राण्यांच्या मागणीच्या मुळाशी आहे ती कसलाही शास्त्रीय आधार नसलेली अंधश्रद्धा” ही अंधश्रद्धाच या प्राण्यांच्या जीवावर बेतते.

मागच्या महिन्यात पाटील यांच्या फिरत्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर, येथे खवल्या मांजराच्या विक्रीसाठी काही मंडळी येणार आहेत. पथकाने सापळा लावून तिथे छापा टाकला असता तीन जण ज्यापैकी दोघे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि एक सांगलीतला. यांना अटक करण्यात आली, त्यांच्याकडे असलेले खवल्या मांजरही जप्त करण्यात आलं.

पाटील म्हणाले कि या खवल्या मांजराला सिंधुदुर्गातल्या या दोन जणांनी पकडून वैभववाडी तालुक्यामध्ये ठेवलं होतं. त्याची विक्री करण्यासाठी ते गगनबावडा या ठिकाणी आले होते. हे खवले मांजर साधारणपणे दीड मीटर लांब आणि दहा किलो वजनाचं होतं.

हा प्राणी विकत घेणारा इसम सांगली जिल्ह्यातला असून तो पुढे त्याची विक्री करणार होता. “याचं लागेबांधे अंतरराष्ट्रीय टोळीशी असण्याची शक्यता आहे. तो पुढे एका व्यक्तीला खवले मांजर विकणार होता. त्यांचा संपर्क व्हाट्सअप वरून होता आणि या संपर्कामध्ये कोड नंबर सुद्धा वापरण्यात येत होता. पण यांना अटक झाल्यानंतर त्या माणसाचा फोन बंद आहे. या साखळीतील लोकांना बऱ्याचदा या या रॅकेटमध्ये अजून कोण आहे हे ठाऊक नसतं. असे प्राणी किंवा माळ खरेदी करण्याची आणि विकण्याची प्रक्रिया ही एखाद्या रिले रेस प्रमाणे असते,” असे पाटील म्हणाले.

मुंग्या आणि वाळवी खाऊन शेतकऱ्यांचा मित्र ठरणारा हा खवले मांजर निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी प्रचंड उपयुक्त आहे. त्याचमुळे त्याचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या पहिल्या सूचीमध्ये करून (ज्यात वाघाचा ही समावेश आहे) त्याला कायद्यान्वये सर्वोच्च संरक्षण देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 2:24 pm

Web Title: pangolin smuggling and hunts are more than tigers in india dhk 81
Next Stories
1 “शब्दांचे भलतेच अर्थ सांगू नका”, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
2 “उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे”, अनिल गोटे फडणवीस सरकारच्या कारभारावर संतापले
3 पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला – अनिल गोटे
Just Now!
X