भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ऊसतोड मजुरांचा निर्णय तातडीने घ्या. त्यांचा संयम सुटणार नाही याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी १५ दिवस आहेत. त्यांच्यातला एकहीजण साधा शिंकलाही नाही, मग काय चिंता आहे? त्यांना पाठवण्याचा निर्णय झालेला असताना कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. मात्र निर्णय करा असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

जे ठणठणीत बरे आहेत तेदेखील आजारी पडतील. पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहे. एक-दोन ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे या सगळ्यांना काय झालं तर कोण जबाबदार? Random चाचण्या करा, पण यांच्याबद्दलचा निर्णय तातडीने घ्या. ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील. त्यांची लेकरं, आई-बाप घरी एकटे आहेत हा विचारही करा. असंही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्यासाठी पंकजा मुंडे मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. ऊसतोड कामगारांबाबत सकारात्मक निर्णय होईल असं सरकारने म्हटलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीत आता झारीतले शुक्राचार्य कोण? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. करोनाचं संकट देशावर घोंघावतं आहे. त्यामुळे लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशात विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. त्यांची तपासणी करुन त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजा मुंडे मागील दोन ते तीन आठवड्यांपासून करत आहेत.