ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली या खळबळजनक दाव्याबाबत अखेर गोपीनाथ मुंडेंची मुलगी आणि ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर बुधवारी मौन सोडले आहे. अमेरिकास्थित सायबर एक्सपर्ट सय्यद शुजा याने (दि.२१) लाइव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये हा गंभीर आरोप केला होता. त्याच्या या दाव्यानंतर भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे
प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मला या विषयावर काय बोलावं हेच कळत नाही… मी हॅकर नाही…मी त्यांची मुलगी आहे…या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावं लागतंय…ते त्रासदायक आहे…मी या गोष्टीचे भांडवल करू इच्छिणारी राजकारणी नाही…गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यूनंतर मी स्वतः गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची विनंती केली होती…ती चौकशी पूर्ण झाली आहे…त्यामुळे आता याच्यावर अधिक चौकशी करायची आवश्यकता असल्यास देशात मोठे नेते आहेत ते स्वतः याची दखल घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील….त्यामुळे कोण बोललं…काय बोललं…या गोष्टी निरर्थक ठरतात जेव्हा ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही हे निवडणूक आयोगाने स्वतः सांगितलं आहे….त्यामुळे या विषयाला आता पूर्णविराम द्यायला हवा’.

रॉ मार्फत चौकशी करावी – धनंजय मुंडे</strong>

यापूर्वी, ‘गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला तेव्हाच तो अपघात नसून घातपात असावा अशी शंका साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होती. त्यामुळे सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजा यांनी पत्रकार परिषद घेऊन जे गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत त्यामुळे या शंकेला पुष्टीच मिळाली आहे. मुंडे यांचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासूनच हा अपघात आहे की घातपात असा संशय आम्हाला होता आणि आजही तो कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आणि इव्हीएम घोटाळ्याची चौकशी रॉ मार्फत करण्यात यावी’, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.