विनयभंग प्रकरणी परमानंद हेवाळकर याला कुडाळ पोलिसानी शनिवारी रात्री अटक करून न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. मुख्यमंत्री यांच्याकडे केरवडे गावाने वाळीत टाकले प्रकरणी तक्रार केली होती. महादेवाचे केरवडे येथील एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायालयाने वॉरंट बजावले होते, तो पोलिसांना सापडत नव्हता.

गावाने वाळीत टाकल्याचे सांगत मुख्यमंत्र्यानाच साकडे घालणाऱ्या महादेवाचे केरवडे (ता. कुडाळ)चा परमानंद हेवाळकर याच्या मंत्रालयात केलेल्या २२ तक्रारींची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान हेवाळकर याने केरवडे येथे गणेशपूजन करून विसर्जनदेखील केले. जुना वॉरंट असणाऱ्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले . कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील परमानंद हेवाळकर याने गावातील लोकांनी आपल्या कुटुंबास वाळीत टाकल्याने गणपती पूजन थेट मंत्रालयासमोर केले. मुख्यमंत्र्यांनी वर्षांवर आरतीत सहभाग घेऊन हेवाळकरला सहानुभूती दाखवत त्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली.

रत्नागिरी विभागाच्या खास पोलीस पथकासह परमानंद हेवाळकर याने केरवडेत गणेश पूजन केले. त्यानंतर गणेश विसर्जनदेखील केले. या दरम्यान गावातील लोकांनी त्याला वाळीत टाकल्याबाबत पोलिसांना प्राथमिक चौकशीत तथ्य आढळले नसल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान कुडाळ तहसीलदार यांनी गावातील मानकरी व हेवाळकर यांची बैठक आयोजित केली, पण ही बैठक वेळेअभावी झाली नाही. यापूर्वी परमानंद हेवाळकर याने गावाने वाळीत टाकल्याचे प्रकरण, विनयभंगप्रकरणी त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा अशाबाबत सुमारे २२ तक्रारी मंत्रालयीन पातळीवर केल्या होत्या. पण प्रशासनाने दखल घेतली नव्हती. थेट मुख्यमंत्र्यानाच हेवाळकर याने साकडे घातल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रत्नागिरीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या खास पथकाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. हे पथक हेवाळकरसोबतच केरवडेत पोहचले आहे. मुख्यमंत्र्यानीच चौकशीचे आदेश दिल्याने कागदी घोडे नाचविणारी प्रशासकीय यंत्रणा याप्रकरणी चौकशी प्रत्यक्ष गावात जाऊन आणि गावकऱ्यांची बैठक घेऊन करत आहे असे सांगण्यात आले. परमानंद हेवाळकर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनीदेखील दिले आहेत. गृह राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ातच जातपंचायत प्रकरणाची तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने यंत्रणेचा पर्दाफाश झाला आहे.  दरम्यान विनयभंगप्रकरणी पोलिसांनी हेवाळकर याला अटक केली.