एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी लोकांना नरेंद्र मोदींच्या उद्देशावर शंका नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांचं वक्तव्य काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. राहुल गांधी यांनी ‘गली गली मै शोर है, चौकीदार चोर है’ अशा शब्दांत मोदींवर टीका करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांना राफेल करारावरुन काँग्रेस करत असलेले आरोप आणि काँग्रेस नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, ‘हा काँग्रेस नेत्यांच्या नाही तर निर्णय घेताना त्यात सहभागी झालेल्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. लोकांना काय वाटतं याचा आहे. लोकांना मोदींच्या उद्देशावर शंका नाही. सुरुवातील निर्मला सीतारमन माहिती देत होत्या. आता अरुण जेटलींनी त्यांची जागा घेतली आहे. करारातील महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली नाही असं दिसत आहे. ज्याप्रकारे माहिती सादर करण्यात आली त्यावरुन शंका उपस्थित झाल्या आहेत’.

राफेलच्या किंमती जाहीर करण्यास धोका नाही, बोफोर्सवेळी भाजपानेही हीच मागणी केली होती: शरद पवार

यावेळी शरद पवारांनी विरोधकांची करारातील तांत्रिक माहिती आणि तपशील जाहीर करण्याची मागणी चुकीची असल्याचं सांगितलं. मात्र विमानाची किंमत जाहीर करण्यात काही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती गठीत करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.

राफेलच्या किंमती जाहीर करण्यास कोणताच धोका नसल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. बोफोर्स तोफांवेळी काँग्रेसवर आरोप झाल्यानंतर भाजपाने हीच मागणी केली होती. सुषमा स्वराज यांनी कोणत्याही परिस्थितीत बोफोर्स संबंधीची माहिती जाहीर झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती, अशी माहिती पवार यांनी दिली. संरक्षणासंबंधीची गोपनीय माहिती जाहीर केल्यास देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल असा युक्तीवाद भाजपाकडून केला जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांनी मोदींना क्लिन चीट दिली आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल असं राष्ट्रवादी खासदार माजीद मेमन बोलले आहेत. तर काँग्रेसने शरद पवारांच्या वक्तव्याने आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे विरोधक एनडीए सरकारविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करत असताना पवारांच्या वक्तव्याने धक्का बसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.