रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील सन २०१८ मधील खटला बंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना हायकोर्टानं शनिवारी राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. अज्ञा अन्वय नाईक यांनी ही याचिका दाखल केली आहे.

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (वय ५२) यांनी सन २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. तत्पूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती त्यात त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह दोघांनी आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं होतं. या अन्वय नाईक यांची अज्ञा नाईक ही मुलगी असून तिने हायकोर्टात आपल्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणाची फाईल बंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी याचिकेद्वारे केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये आरोप केला होता की, “मी आणि माझ्या आईला टोकाचं पाऊल उचलावं लागतयं. कारण तीन कंपन्यांची ५.४० कोटी रुपयांची थकलेली देणी देण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत त्यामुळे आम्ही अत्यंत दबावाखाली आहोत.” अर्णब गोस्वामींसह स्कायमिडीया आणि आयकास्ट एक्सचे फिरोझ शेख तसेच स्मार्टवर्कचे नितीश सारदा यांचीही नावं या सुसाईड नोटमध्ये होती.

दरम्यान, अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी अलिबाग पोलिसांमध्ये अर्णब गोस्वामी, शेख आणि सारदा यांच्याविरोधात पतीच्या सुसाईड नोटच्या आधारे तक्रार दाखल केली होती. मात्र, या तीनही आरोपींविरोधात ठोस पुरावे नसल्याचे कारण देत पोलिसांनी २६ एप्रिल २०१९ रोजी ही केस बंद केली होती. त्यानंतर ५ मे रोजी अक्षदा यांनी एक व्हिडिओ तयार केला यामध्ये आपल्या पतीला न्याय मिळवून द्या, अशी मागणी केली होती. त्यानुसार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून पोलिसांना तपासाचे आदेश दिले.

१६ ऑक्टोबर रोजी स्थानिक कोर्टाने अलिबाग पोलिसांना या प्रकरणाच्या फेर तपासाला परवानगी दिली. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना ताब्यात घेतले. पुढे अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी आणि शनिवारीही सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचा अलिबागच्या तुरुगांतील मुक्काम वाढला आहे.