अशोक तुपे

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद केली. सरकारने आवाहन करूनही सेवा देण्याची तयारी दर्शविली नाही.  मात्र एक शतकाहून अधिक काळ सेवाभावीवृत्तीने वैद्यकीय सेवा देणारे बुथ हॉस्पिटल हे पुढे आले. पहिल्या दिवसापासून जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांवर तेथे उपचार केले जात आहेत.

अमेरिकन मराठी मिशन १९०१ मध्ये बुथ हॉस्पिटलची उभारणी केली. त्याच दरम्यान प्लेगची साथ आली. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. गार्डन हॉल यांनी प्लेगच्या साथीत रुग्णांवर उपचार सुरू केले. बुथ हॉस्पिटल हे दगडी दवाखाना म्हणूनही ओळखले जाते. देवी, पिवळा ताप, टीबी, कॉलरा अशा अनेक आजारांच्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात. लहान मुलांमध्ये साठच्या दशकात ‘ग्रीन डायरिया’चा फैलाव झाला होता. सेवाभावातून रुग्णालयाने केलेल्या उपचारांमुळे लोकांना जीवदान मिळाले. डॉ. अ‍ॅण्डरसन, डॉ. स्टॅण्डन व अलीकडच्या काळातील डॉ. चक्रवर्ती, डॉ.वॉरन या डॉक्टरांनी व्रतस्थपणे सेवा दिली. आजही प्लेग ते करोना अशी रुग्णसेवेची शतकोत्तर वाटचाल बुथ हॉस्पिटलची चालू आहे. पूर्वी रुग्णालयाचे व्यवस्थापन हे मराठी मिशनकडे होते. पण आता १९३९ पासून सॉल्वेशन आर्मीकडे आले आहे. सॉल्वेशन आर्मीचे १३१ देशात सामाजिक कार्य सुरू आहे.

एड्सच्या रुग्णांवर जेव्हा कोणी उपचार करत नव्हते त्यावेळी बुथ हॉस्पिटलने ते काम केले. हजारो एचआयव्हीग्रस्तांवर आजही उपचार सुरू आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुथ हॉस्पिटलची पहाणी केली. रुग्णालयात पन्नास खोल्या, प्रत्येकाला स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय तसेच सर्व अत्यावश्यक सुविधा असल्याने करोनाबाधितांवर उपचार करण्याकरिता बुथ हॉस्पिटलची निवड केली. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी केल्यानंतर येथे करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी पाठविले जातात. रुग्ण येण्यापूर्वी सर्व हॉस्पिटल सज्ज झालेले असते. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी व्हीआरडीई (वाहन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान) या वाहन चाचणी संस्थेने उभारलेल्या निर्जंतुकीकरण कक्षातून रुग्ण आत येतात. रुग्णालयात सात खाटांचा अतिदक्षता विभाग, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर असे मिळून २६ लोक सध्या सेवा देत आहेत. रुग्णालयाने स्वत: पीपीए कीट खरेदी केले होते. आता जिल्हा रुग्णालय त्याचा पुरवठा करते. रुग्णालयाच्या प्रत्येक खोलीत सॅनिटायझर, मास्क तसेच अन्य सुविधा आहेत. व्हेंटिलेटरची खास व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. करोनामुळे रुग्णालयात येणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. तेथे सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३१ करोनाबाधित रुग्णांवर उपचार करूनही सर्व सुरक्षित आहेत. डॉक्टर व कर्मचारी हे हॉस्पिटल परिसरातच राहातात.

मानवतेचे एक मोठे काम रुग्णालयात सेवाभावातून सुरू आहे. त्यात विशेष म्हणजे भीतीचाही लवलेश नाही. नगर जिह्यत करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना आवाहन केले. पण रुग्णालये व डॉक्टर हे दूर राहिले. अशा काळात बुथ हॉस्पिटलने मानवतेतून केलेले कार्य हे मैलाचा दगड ठरले आहे. ते खऱ्या अर्थाने करोना योद्धे बनले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बुथ हॉस्पिटलला सेवेची संधी मिळाली. हे मोठे समाधान आहे. एका रुग्णामागे तो बरा होऊन घरी जाईपर्यंत वीस ते तीस हजार रुपये खर्च येतो. जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर उपचारासाठी येतात. पण रुग्णाची देखभाल आम्हीच करतो. रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागवतो. रुग्णांना मानसिक आधार दिला जातो.

– देवदान कळकुंबे, मुख्य प्रशासक, बुथ हॉस्पिटल.

करोनाबाधित रुग्णाला बाहेर लोक नाकारतात. मात्र आम्ही त्यांच्या भावना समजून घेतो. काही रुग्ण सुरुवातीला आरडाओरडा करतात. त्रास देतात. सूचना ऐकत नाहीत. ते तणावात असतात. पण आम्ही शांतपणे सामोरे जातो. पुढे तर ते आमचे सारे ऐकतात. आम्ही कुटुंबातीलच आहोत, असे त्यांना वाटायला लागते. धर्माच्या बंधनापेक्षा सेवेचा धर्म महत्त्वाचा ठरतो. रुग्ण बरा होऊन जाताना खूप आनंद होतो.

– सत्वशिला वाघमारे, अधीक्षिका, बुथ हॉस्पिटल