क्रिकेट सट्टय़ाची उधारी चुकवण्यासाठी अपहरण; सहा आरोपींना अटक, एक फरार

यवतमाळ : ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी झालेल्या तरुणाच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी सहा तासात छडा लावून सहा आरोपींना अटक केली. अपहृत हर्ष ईश्वर नचवाणी (१७) याची शहरालगतच्या बोरले लेआऊ टमधून एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरातून सुटका करण्यात आली. क्रिकेट सट्टय़ाची उधारी चुकवण्यासाठी हे अपहरण करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. या घटनेमागील मुख्य सूत्रधार हा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे.

या अपहरण प्रकरणी पोलिसांनी नीलेश बापूसिंग राठोड (२१, रा. बोरगाव दाभडी, ता. आर्णी), अरविंद लक्ष्मण साबळे (२६, रा. पिंपळगाव), नीलेश वल्लाज उन्नरकाट (३७, रा. चांदणी चौक), सतीश देवीदास शेलोटकर (३७, रा. गोदामफैल), शुभम शंकर तोलवाणी (२५, रा. सिंधी कॅम्प), सूरज ऊर्फ सपना विश्वनाथ शुक्ला (३८, रा. बाजोरिया नगर, यवतमाळ) या सहा आरोपींना अटक केली. किसन नारायण कोटवाणी (२५) हा आरोपी पसार झाला. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम तोलवाणी हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. शुभम आणि किसन हे क्रिकेट सट्टय़ात कर्जबाजारी झाल्याने मोठी रक्कम मिळवून कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी आपल्याच समाजातील व त्यांचा परिचित असलेल्या ईश्वर नचवाणी यांच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला. त्यासाठी आरोपी नीलेश उन्नरकाट याला हर्षच्या अपहरणाची सुपारी दिली. हर्षचे अपहरण करून नीलेश व अन्य आरोपींनी त्यास शहरालगतच्या जंगलात नेऊन त्याच्याकडून वडिलांकडे खंडणीचे ५० लाख देण्याची मागणी करणारा व्हिडीओ बनवून घेतला. त्यांनतर आरोपी हर्षला घेऊन शहरातील बोरले लेआऊटमध्ये गेले. येथे एका राजकीय पदाधिकाऱ्याचे घर नेहमी बंद असते. तेथे काम करणाऱ्या सपना शुक्ला हिला हाताशी धरून आरोपींनी हर्षला तेथे डांबून ठेवले. दुसरीकडे मुख्य सूत्रधार शुभम तोलवाणी हा हर्षच्या वडिलांसोबत हर्षचा शोध घेत फिरला. त्यानेच हर्षच्या वडिलांना पोलिसांकडे तक्रार करू नका, खंडणीचे पैसे देऊ न टाका म्हणून आग्रह धरला. मात्र, हर्षचा कुठेच पत्ता लागत नसल्याने ईश्वर नचवाणी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्यासोबत शुभमही गेला. मात्र तो सतत दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने पोलिसांना संशय आला. तोपर्यंत पोलिसांच्या पथकांनी शहरातील काही संशयितांवर नजर ठेवली. तेव्हा दत्त चौकातील कापड दुकानदार किसन कोटवाणी हा गायब असल्याचे निदर्शनास आले. या काळात पोलिसांनी नीलेश उन्नरकाट याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच पोलिसांना सर्व घटनाक्रम कळला. लागलीच पोलिसांनी शुभम तोलवाणीस ताब्यात घेतले. प्रारंभी या घटनेशी आपला संबंध नसल्याचे सांगणारा शुभम पोलिसांचा हिसका मिळताच फुटला. त्यानंतर पोलिसांनी बोरले लेआऊ टमधील घरावर धाड घालून हर्षची इतर आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. येथे चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. किसन कोटवाणी हा आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.  क्रिकेट सट्टय़ात उद्ध्वस्त झाल्याने अनेक लोक गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट झाले.

शुभम भाजयुमोचा स्वयंघोषित पदाधिकारी

गोल्डी फॅशन व ड्रेसेसचा संचालक शुभम तोलवाणी हा भाजपचा सोशल मीडिया हाताळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतचे त्याचे छायाचित्र समाज माध्यमात व्हायरल झाले आहे. मात्र शुभम तोलवाणी याचा भारतीय जनता पक्षाशी काहीही संबंध नाही. तो भाजयुमोचा स्वयंघोषित पदाधिकारी असल्याचा खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी केला. तो स्वयंस्फूर्तीने भाजपचा सोशल मीडिया हाताळत होता. त्याने अनेकदा पद मागितले, मात्र त्याची कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात आली नव्हती, असे डांगे म्हणाले.