पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी नांदेडला

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील एका तरुणाचा नांदेड पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत तरुणाच्या कुटुंबीयांनी मृतदेह जवळाबाजार पोलिस चौकीत आणून ठेवल्याने एकच गोंधळ उडाला. मृतदेहाचा पंचनामा करून इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्याची मागणी तरुणाच्या नातेवाइकांनी केली. बबलू शेख असे मृत तरुणाचे नाव असून नातेवाइकांशी झालेल्या चर्चेनंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेडला पाठवण्यात आला.

नांदेड येथील एका घरफोडी प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या भ्रमणध्वनीवरून जवळाबाजार येथील बबलू शेख याच्याशी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले होते. त्यावरून नांदेडच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली. यामध्ये त्याच्या परभणी येथील नातेवाइकाचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्याचे घर दाखविण्यासाठी पोलिसांनी बबलू शेख यास २ सप्टेंबर रोजी परभणीला नेले व त्यानंतर तेथून सोडून दिले. तपासाच्या निमित्ताने परत १३ सप्टेंबर रोजी त्यास जवळाबाजार येथून ताब्यात घेतले होते. परंतु नंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांनी रविवारी रात्री जवळा बाजार पोलीस चौकीत आणून ठेवला. नांदेड पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असून या  प्रकरणी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली. या घटनेमुळे जवळाबाजारमध्ये वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुधाकर रेड्डी, हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पोलिसांनी जवळाबाजार येथे धाव घेतली. पोलिसांनी बबलू शेख यांच्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीच मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पोलिसांवर कारवाईची मागणी नातेवाइकांनी लावून धरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करावी, अशी मागणी बबलू शेख यांच्या कुटुंबीयांनी लावून धरली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कुठलाही तोडगा निघाला नाही. परिणामी गेल्या २० तासांपासून मृतदेह जवळाबाजार येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला होता.