11 August 2020

News Flash

पोलिसांसमोर चोरटय़ांना रोखण्याचे आव्हान

वीस दिवसांमध्ये आठ घरांमध्ये चोरीच्या घटना आणि अवघ्या एका तासात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून सोनसाखळी चोरांनी मांडलेल्या उच्छादामुळे पोलीस यंत्रणेसमोर चोरटय़ांना रोखण्याचे आव्हान उभे

| April 23, 2014 09:50 am

वीस दिवसांमध्ये आठ घरांमध्ये चोरीच्या घटना आणि अवघ्या एका तासात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून सोनसाखळी चोरांनी मांडलेल्या उच्छादामुळे पोलीस यंत्रणेसमोर चोरटय़ांना रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. चोरांनी बंद घरांना लक्ष्य केले असून ८ घटनांमध्ये साडेपाच लाख रुपयांचा ऐवल लंपास करण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणाऱ्या रहिवाशांसमोर चिंतेचे सावट निर्माण करणाऱ्या या घटना आहेत. १ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत शहरातील विविध भागातून चोरांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकडही लंपास केली आहे. साईनगर भागात चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. चोरांनी तर एकाच दिवशी तीन बंद घरांचे दरवाजे तोडून २ लाख रुपयांचा ऐवज पळवला. गाडगेनगर भागातील विलास कॉलनीतील अनिकेत सपकाळ यांच्या बंद घरातून चोरांनी २५ हजार रुपयांचा ऐवज पळवला. जमील कॉलनीत राहणाऱ्या समीर पठाण यांच्या घरातून १० ग्रॅमची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली. साईनगर भागात राहणाऱ्या प्रल्हाद खंडारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरी कुलूप पाहून चोरांनी संधी साधली आणि सोन्या-चांदीचे दागिने, रोख रकमेसह १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. साईनगर भागातीलच निशिगंधा कॉलनीतील कीर्ती चोपडे यांच्या फलॅटमध्ये शिरून चोरांनी १ लाख १२ हजार रुपयांचे दागिने पळवले. कुलूपबंद घरांवर पाळत ठेवून चोरटय़ांनी आपले डाव साधण्यास सुरूवात केल्याने पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भरदिवसा चोरीच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव दिसून आला आहे. शेजारी चोरीची घटना घडूनही त्याचा थांगपत्ता देखील शेजाऱ्याला लागू नये, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे सोनसाखळी चोरांनी देखील पुन्हा एकदा हैदोस सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यात सोनसाखळी हिसकावण्याच्या सहा घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे. सोमवारी एकाच तासात सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या. यात महिलांना सुमारे ७० हजार रुपयांचा फटका बसला. श्याम चौक परिसरात सोमवारी सकाळी अलका श्रीखंडे (५६, जीवनछाया कॉलनी) यांना दोघा मोटरसायकलस्वारांनी अडवले आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. अलका श्रीखंडे या महिला महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. त्या महाविद्यालयात जात असताना ही घटना घडली. चोरटय़ांनी मागाहून येऊन सोनसाखळी हिसकली. अलका यांनी आरडाओरड केली, पण चोरटे लगेच पळून गेले. त्यांच्या सोनसाखळीची किंमत १० हजार रुपये होती. कोतवाली पोलिसांनी चोरटय़ांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांची अनेक भागात नाकाबंदी केली. मात्र, त्याच कालावधीत देवरणकरनगर भागात सोनसाखळी चोरीची दुसरी घटना घडली. सकाळी ९.३० वाजता महेश भवनकडे पायी जाणाऱ्या कल्पना वीरेंद्र चांडक यांच्या गळ्यातील २५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरटय़ांनी हिसकावून पळ काढला. कल्पना चांडक या महेश भवनात आयोजित विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जात होत्या. या मंगळसूत्राची किंमत ६० हजार रुपये होती. हे चोरटे अपॅचे मोटरसायकलवरून आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2014 9:50 am

Web Title: police having challenge to stop robbery
Next Stories
1 आर्णी बाजार समितीत हजारो िक्वटल हरभरा पडून, शेतकरी हैराण
2 आंतरजातीय विवाह केला म्हणून दोन महिलांचा खून
3 सांगली जिल्हा बँकेची चौकशी गुप्त ठेवावी
Just Now!
X