कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा गतिमान झाली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुण्याचे गुन्हा अन्वेषण पथक शहरात दाखल झाले आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणावेळी पिस्तूल विकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मनीष नागोरी याच्याकडे चौकशी सुरूकेली आहे. पानसरे यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ अशा आशयाची पत्रे आली होती. त्यामुळे ही पत्रे कोणी पाठविली याचा शोध घेतला जात आहे, तर एका व्याख्यानप्रसंगी पानसरे यांना प्रश्न विचारणाऱ्या एका विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना सोमवारी दुपारी कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कॉ. पानसरे यांच्या हल्ल्यात चौकशीसाठी बोलविले आहे. कोल्हापूर परिसरातील शस्त्रास्त्र विक्रीच्या व्यवसायातील नागोरी हा सराईत गुन्हेगार आहे. तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला आहे. त्याच्याकडून काही माहिती मिळतेय का, याची चाचपणी कोल्हापूर पोलीस करीत आहेत.
 या प्रकरणाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कसून चौकशी सुरू केली आहे. सुरुवातीला दहा पथके रवाना झाली होती, तर सायंकाळी आणखी तितकीच पथके तपासासाठी गेली असल्याचे सांगण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणे पानसरे यांच्यावर हल्ला झाला असल्याने तपासाचा मुख्य रोख त्यावर ठेवण्यात आला आहे.
सकाळची फिरण्याची वेळ, पुरोगामी चळवळीशी संबंध, सीसीटीव्ही आजूबाजूला नसणे, दुचाकीवरून आलेले बुरखाधारी अशी काही साम्यस्थळे दोन्ही हल्ल्यांत दिसून आली आहेत. गोिवद पानसरे यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ अशा आशयाची काही पत्रे सहा-सात महिन्यांपूर्वी आली होती. त्यावर पुणे पोस्टाचा शिक्का होता. या पत्राची दखल पानसरे यांनी घेतली नव्हती, असे भाकपचे सरचिटणीस रघुनाथ कांबळे यांनी सांगितले. ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून पोलीस दाभोलकर व पानसरे यांचे खुनी एकच आहेत का याचाही शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. या तपासासाठी पुण्याहून गुन्हे अन्वेषण पथक शहरात दाखल झाले आहे.

शस्त्रक्रिया यशस्वी
गोिवद पानसरे यांच्यावरील गळा, कंबर व पाय या तिन्ही ठिकाणची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे डॉ. उल्हास दामले यांनी सांगितले.  त्यांची प्रकृती चांगली असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव काहीसा कमी झाला. उमा पानसरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे डॉ. दामले यांनी सांगितले. मंगळवारी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने बिंदू चौकातून मोर्चा निघणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे, असे प्रा. उदय नारकर यांनी सांगितले.

कॉ. पानसरे यांच्या हल्ल्याचा एकही प्रत्यक्षदर्शी मिळालेला नाही. हल्ला झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू आहे. या हल्ल्याच्या तपासासाठी वीस पथके तयार करण्यात आली आहेत. शेजारच्या जिल्ह्य़ातील पोलिसांची देखील तपासासाठी मदत घेतली जात आहे.
-रितेश कुमार , कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक

‘पुरोगामित्वाला धमकावण्याचा प्रकार’
पुरोगामित्वाला धमकवण्याचा आणि नष्ट करण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याने राज्यातील पुरोगामित्वाची चिंता वाढली आहे. -शदर पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष</strong>
******
ज्याने स्वत:चे जीवन समाजासाठी आणि राष्ट्रासाठी अर्पण केले, अशा एका विचारवंतावर हल्ला होतो याचा अर्थ समाजकंटकांना कुणाची भीती राहिलेली नाही. -अण्णा हजारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
******
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अजून पकडले नाहीत, असे असताना गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने धक्का बसला. महाराष्ट्रात आता पुरोगामित्वाला जागा नाही. हे या हल्ल्याने दाखवून दिले आहे. जे विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. घटनात्मक मूल्यांसाठी उभे राहतात, त्यांना संपवण्याचा हा कट आहे.  
-मुक्ता दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
******
दाभोलकर आणि पानसरे यांचे हल्लेखोर एकच आहे का? याचा शोध घ्यावा. हा विचार करून रचलेला कट आहे. -मेधा पाटकर
******
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्ती यामागे आहेत. गेल्या काही दिवसांत गोडसे प्रवृत्तीला उन्माद चढला आहे. त्यांच्यावर राज्यकर्त्यांची जरब राहिलेली नाही. –डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत
******
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाषणावेळी पानसरे यांनी नथुराम गोडसे समर्थकांबद्दल कठोर भाषा केली होती. ती न आवडल्याने त्यांच्यावर हल्ला झाला आहे. लोकशाही राज्यात सामाजिक कार्यकर्त्यांवर राजरोसपणे खुनी हल्ले होणे ही लोकशाहीची थट्टा आहे. या हल्ल्याने परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
– बाबा आढाव, कामगार नेते
******
या गुन्ह्य़ाचा तपास होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पुरोगामी चळवळीच्या अग्रभागी असणाऱ्या पानसरे यांच्या हल्ल्यातील शासनाला योग्य ते गांभीर्य निश्चित असून हल्लेखोरांना पकडले जाईल.
-राम शिंदे, गृहराज्यमंत्री
******
अशा कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होऊ लागले तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणार कोण? हल्लेखोरांना शासनाने अटक केली पाहिजे.
-राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते