सोलापूर : भाडे तत्त्वावर शेती नांगरणीसाठी विकत घेतलेल्या दोन बैलांपैकी एका बैलाचा शेतात विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा झाल्यानंतर प्रशासनाकडून आठ दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही दिले गेले. परंतु त्यास दोन महिने उलटून देखील नुकसान भरपाई न मिळाल्याने हतबल झालेल्या एका गरीब शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथे घडली.

आनंद लक्ष्मण यादव (वय ३२) असे या दुर्दैवी शेतक ऱ्याचे नाव आहे. सुलतानपूर गावच्या शिवारात यादव कुटुंबीयांची अवघी दीड एकर शेती आहे. परंतु एवढय़ाशा लहान शेतीवर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होणे शक्य नव्हते. त्यामुळे आनंद यादव याने खिलारी जातीचे दोन बैल विकत घेतले. त्यासाठी कर्जाऊ रक्कम घेतली होती. या बैलांच्या मदतीने दररोज कोणत्या ना कोणत्या शेतक ऱ्यांकडे जाऊन त्यांच्या शेतात नांगरणी व इतर कामे मोठय़ा कष्टाने करायचा. त्यातून दररोज दीड हजारांपर्यंत मिळकत हाती पडायची. या उत्पन्नातून तो कर्जाची नियमितपणे परतफेडही करायचा. परंतु शेतात कामे करीत असताना यादव याच्या दोन बैलांपैकी एका बैलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. त्यामुळे यादव याच्यावर आभाळ कोसळले. या दुर्घटनेनंतर महावितरण कंपनीच्या यंत्रणेसह अन्य संबंधितांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यादव याची गरिबी आणि दयनीय अवस्था पाहून प्रशासनाने त्याला शासनाकडून योग्य मदत मिळण्याचे आश्वासन दिले. आठ दिवसांत आर्थिक मदत हाती पडेल, या शब्दावर विश्वास ठेवून त्याने दिवस ढकलले. इकडे ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, त्या एका फायनान्स कंपनीसह अन्य शेतक ऱ्यांनी कर्जाची परतफेड होण्यासाठी तगादा लावला. यातच शेतात कामे करण्यासाठी बैल उपलब्ध झाला नाही. त्यामुळे यादव याचे कामाचे चक्रच थांबले.

या परिस्थितीत देणेक ऱ्यांची देणे कशी द्यायची, घराचा संसार कसा चालवायचा, याची विवंचना लागल्याने यादव हा पूर्णत: हतबल झाला होता. पत्नीसह चार वर्षांचा आणि दोन वर्षांच्या मुलांचे पोट कसे भरायचे, याची चिंतेने पछाडल्यामुळे अखेर त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने समाज माध्यमावर स्वत:चे मनोगत मांडले. विषारी औषध प्राशन केल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्याला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती आणखी खालावल्याने त्याला शासकीय यंत्रणेमार्फत पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.