विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापेक्षा सत्ता स्थापनेदरम्यान झालेल्या घटनामुळे महाराष्ट्राचं राजकारण रंगतदार वळणार पोहोचलं होतं. पण, ऱाष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सगळ्यांनाच आर्श्चयाचा झटका बसला होता. अजित पवार यांनी घेतलेल्या त्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे.

प्रफुल्ल पटेल हे ‘आजतक’च्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना राज्यात सत्तांतरावेळी घडलेल्या घटनांविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली. “विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यकत तितकं संख्याबळ नव्हतं. त्यामुळे आम्ही विरोधी बाकांवर बसणार होतो. पण, नंतर शिवसेना आणि भाजपात मतभेद सुरू झाली. त्यांच्या चर्चेमुळे कोणताही होत नव्हता. त्याचदरम्यान अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असावी. सरकार स्थापन करू शकत नाही, त्यामुळे आमच्यासोबत या, अशी चर्चा फडणवीस यांनी केली,”

“भाजपासोबत जाण्यासंबंधी चर्चा झाली होती. पण सरकारमध्ये जाण्याची शक्यताच नव्हती कारण आमच्याकडं संख्याबळच नव्हतं. हे सगळं भाजपा आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेल्यानं झालं होतं. पण, त्यात राष्ट्रवादीचा असा कोणताही विचार नव्हता. पण, भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय हा स्वतः अजित पवार यांचाच होता. काही गोष्टींवर पडदा असलेला बरा, यात लपवण्यासारखं काही नाही. मात्र, आता सगळं काही घडून गेलं आहे, त्यामुळे चर्चा करण्याची गरज नाही. त्यानंतर अजित पवार यांनी स्वतःहून म्हटलं होतं की, पक्षाला नाराज करण्याचा आपला कोणताही विचार नव्हता,” असंही पटेल यांनी सांगितलं.