राज्यातील आगामी निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमने युती केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांनी हातमिळवणी केल्याने राज्यात इतर पक्षांसमोर एक नवं राजकीय आव्हान उभं राहणार आहे. दोन्ही पक्षांनी दलित-मुस्लिम ऐक्याची हाक दिली आहे. औरंगाबादमध्ये 2 ऑक्टोबरला दोन्ही पक्ष एकत्र सभा घेणार आहेत.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दोन्ही पक्षांनी युती केली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आतापर्यंत दलित आणि मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर करण्यात आल्याचं सांगताना २ ऑक्टोबरला राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्ष राज्यात एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार आहेत. अहमदनगर महापालिकेत युतीचा पहिला प्रयोग केला जाणार आहे.

युतीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असणार आहे. दोन्ही पक्ष महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत.