30 November 2020

News Flash

‘लष्कराचे यांत्रिकी दळ देशाची मोठी शक्ती’

एसीसी अँड एसला ‘प्रेसिडेंट स्टँडर्ड’ प्रदान

प्रेसिडेंट स्टँडर्ड प्रदान केल्यानंतर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी एसीसी अँड एसच्या अधिकारी व जवानांसमवेत संवाद साधला. या वेळी लष्करप्रमुख बिपीन रावत उपस्थित होते.

एसीसी अँड एसला प्रेसिडेंट स्टँडर्डप्रदान

लष्कराचे यांत्रिकी दळ ही देशाची मोठी शक्ती व क्षमता आहे, ही शक्तीच सर्व आव्हानांचा सामना करत देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यास सक्षम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती तथा लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख प्रणब मुखर्जी यांनी केले. नगरमध्ये १९४८ मध्ये स्थापन झालेल्या आम्र्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस, रणगाडा प्रशिक्षण केंद्र) या केंद्राने आजवरच्या युद्धात, शांततेच्या काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल व ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची पात्रता मिळवल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते बहुमानाचा ‘प्रेसिडेंट स्टँडर्ड’ (ध्वज) प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

नगर शहरालगत असलेल्या एसीसी अँड एसच्या मैदानावर आज, शनिवारी सकाळी हा बहुमानाचा व केंद्राच्या ओळख व शौर्याचे प्रतीक असणारा हा ध्वज राष्ट्रपतींनी केंद्राचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, लष्करप्रमुख बिपीन रावत, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, यांच्यासह महापौर सुरेखा कदम, जि.प. अध्यक्ष शालिनीताई विखे, खा. दिलीप गांधी, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, तसेच लष्कर व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उज्ज्वल परंपरा व व्यावसायिक कौशल्य असणाऱ्या प्रशिक्षण संस्थेला ध्वज प्रदान करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची भावना व्यक्त करून राष्ट्रपती म्हणाले, की अत्युच्च दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राने आजवर देशासाठीच्या सर्वच युद्धात उत्तम कामगिरी बजावली आहे. यापुढेही केंद्र अशीच कामगिरी बजावेल व देशापुढील आव्हानांचा सामना करेल, लढाऊ वाहनांमागील सैनिक महत्त्वाचा असतो, देशसेवेने प्रेरित सैनिक घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी केंद्र पुढेही पार पाडील.

या बहुमानाच्या प्रीत्यर्थ टपाल विभागाच्या तयार करण्यात आलेल्या ‘फर्स्ट डे कव्हर’ (पाकीट)चे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर केंद्रातील विविध विभागांनाही त्यांनी भेट दिली, तसेच केंद्रातील अधिकारी व जवान यांच्या समवेत छायाचित्र काढून घेतले.

नगरच्या अधिकाऱ्याला मान

एसीसी अँड एसचे प्रतीक होणारा हा ध्वज अर्जुन या रणगाडय़ावर झळकवण्याचा बहुमान नगरकराला मिळाला. राष्ट्रपतींना दिलेल्या मानवंदनेतील संचलनात, प्रेसिडेंट स्टँडर्ड ज्या अर्जुन रणगाडय़ावर प्रथम झळकवला, त्याचे सारथ्य कर्नल सुनील सचदेव यांनी केले. ते मूळचे ब्राह्मणी (ता. राहुरी, नगर) येथील आहेत. संचलनाचे नेतृत्व ब्रिगेडिअर संदीप झुंजा यांनी केले. या संचलनात १४ अधिकारी, १९० जवान, १९ घोडेस्वार, १२ रणगाडे (अर्जुन, भीष्म, टी-१९ व टी-७२), ३ लढाऊ हेलिकॉप्टर व ५ सुखोई विमाने सहभागी झाली होती. रणगाडय़ांनी व सुखोई विमानांनी हवेत केसरी, हिरवा व पांढरा असे ती रंग फवारून तिरंगा साकारला.

ध्वजाचा सन्मान

प्रदान करण्यात आलेला ‘प्रेसिडेंट स्टँडर्ड’ (ध्वज) यापुढे आता एसीसी अँड एसची ओळख बनणार आहे. कोणत्याही कार्यक्रमात, कामगिरीत हा ध्वज आता केंद्राच्या अग्रभागी असेल. निशाण टोळीने सन्मानपूर्वक मैदानात आणलेल्या या ध्वजाची प्रथम हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व शीख धर्मगुरूंनी विधिवत पूजा केली. नंतर त्याला राष्ट्रगीताद्वारे मानवंदना दिली. त्यानंतर तो सन्मानपूर्वक तो राष्ट्रपतींनी केंद्राचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्याकडे प्रदान केला. त्यावर उपस्थितांनी टाळय़ांचा गजर केला.

२४० वर्षांची परंपरा

एसीसी अँड एसची स्थापना जरी १९४८ मध्ये झाली असली तरी या केंद्राला २४० वर्षांची परंपरा आहे, ती ब्रिटिशकाळापासून चालत आली आहे. ब्रिटिशकाळात १७७६ पासून हे केंद्र घोडदळासाठी प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराकडे हस्तांतर होताना त्याचे रूपांतर रणगाडा प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले. या केंद्राने दोन व्हिक्टोरिया क्रॉस, दोन परमवीरचक्र, १६ महावीरचक्र व ५२ वीरचक्रांचा बहुमान प्राप्त केला आहे. आता हे केंद्र ‘मक्का ऑफ ब्लॅक बेरेट्स’ नावाने ओळखले जाते. अनेकदा येथे मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 12:54 am

Web Title: president of india pranab mukherjee on indian army
Next Stories
1 समुद्रात बुडून आठ जणांचा मृत्यू
2 कर्जामुळे विवाह रखडल्याने शेतकरीकन्येची आत्महत्या
3 एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर विरोधी पक्षातील नेत्यांची खास ‘सदिच्छा’ भेट
Just Now!
X