माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवर समाधान व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यांनी निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकारला नवा मार्ग सुचवला आहे. सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घेण्याची सूचना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घोषणेचं स्वागत केलं होतं. त्यानंतर चव्हाण यांनी मोदी सरकारला आणखी एक सल्ला दिला आहे. “केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्यावं. जागतिक सोनं परिषदेच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (७६ लाख कोटी रुपये) इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोने १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं,” असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे.

सरकारचं पॅकेज पुरेसं…

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजचं स्वागत करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, “नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पर्याप्त वाटतं. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च करणं अपेक्षित असून, अमेरिकेतील लेंडिंग आणि स्पेंडिंग धोरणानुसार विचार करणे अपेक्षित आहे. पॅकेजमध्ये आरबीआयने केलेली मदत गृहित धरली जाऊ नये. अमेरिकेने जीडीपीच्या ११ टक्के, जपानने १० टक्के, जर्मनीने २२ टक्के इतकं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामुळे २०४ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताने १० टक्के खर्च करणं अपेक्षित होतं. आता लोकांना विश्वास देणे आवश्यक आहे. पुरवठा जरी झाला तरी मागणी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावं लागेल. अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं ठेवायचं असेल तर कामगार, शेतकऱ्यांच्या खिशात पैसे पोहोचणं गरजेचं आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं.