जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ रझा अकादमीही रस्त्यावर उतरली आहे. मुंबईतील भेंडी बाजार, डोंगरी या भागात रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी दिल्या. तसेच परिसरातील दुकानेही बंद करायला लावली.

पुलवाम्यातील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लुट उसळली आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळून घटनेचा निषेध केला. या प्रसंगी पाकिस्तानविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथे रिक्षा बंद करण्यात आल्या असून नागपूरमध्येही शिवसैनिकांनी टायर जाळून वाहतूक रोखली.

मुंबईत रझा अकादमीच्या कार्यकत्यांनीही मोर्चा काढून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. भेंडी बाजार आणि डोंगरी या भागातील दुकानेही या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद करण्यात आली.

दरम्यान, पुलवामा येथे गुरुवारी दुपारी सीआरपीएफच्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या जवानांना नेले जात होते. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असता तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने ताफ्याला धडक दिली. यात ३९ जवान शहीद झाले.