महापूराच्या विळख्यात अडकलेल्या कोल्हापूर आणि सांगलीमधील पाणी आता ओसरायला सुरूवात झाली आहे. अशातच पुन्हा एकदा कोल्हापूर, साताऱ्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातील घाट परिसरात आज (मंगळवार) आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सांगली आणि कोल्हापूरप्रमाणेच कोकणातल्याही काही भागांना पावसाने झोडपून काढले आहे. त्यातच सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु सोमवारपासून पुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाल्याने जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता पुन्हा एकदा हवामान खात्याने या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील पूरबळींची संख्या आता 43 वर पोहोचली असून 3 जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगलीत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीनंतर आता राधानगरी धरणाचे संर्व दरवाजे बंद करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्गही थांबला आहे.