आई- वडिलांनी इच्छेविरोधात लग्न लावून दिलेल्या १९ वर्षांच्या तरुणीची एका व्हिडिओमुळे सुटका झाली आहे. तरुणीने मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यात स्वत:ची कैफियत मांडली आणि तो व्हिडिओ उस्मानाबाद पोलिसांना पाठवला. हाच व्हिडिओ त्या मुलीच्या मदतीला धावून आला आणि अखेर तिची सुटका झाली.

उस्मानाबाद तालुक्यातील तेरखेडा येथील १९ वर्षांच्या तरुणीचे तिच्या आई- वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या ४६ वर्षीय उत्तम काळे याच्याशी तिचे लग्न लावून देण्यात आले होते. वंशाला दिवा हवा म्हणून उत्तम काळेने दुसरे लग्न केले. तरुणीच्या आई-वडिलांना पुण्यात नवीन घर विकत घेऊन देण्याचे आणि त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्याचे आमिष दाखवून त्याने हे लग्न केले होते. उत्तम काळेला पहिल्या पत्नीकडून चौदा वर्षांची मुलगी आहे. मात्र, तरी देखील पीडित तरुणीचे आई- वडील या शिक्षकाच्या आमिषाला बळी पडले आणि उत्तम काळेशी मुलीचे लग्न लावून दिले. नवर्‍याला चौदा वर्षांची मुलगी असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने लग्नास विरोध केला. मात्र, आई- वडिलांसमोर ती काहीच करु शकली नाही.

लग्नानंतर सासरी आल्यावर पीडित तरुणीला अखेर संधी मिळाली. तिने स्वतःच्या मोबाईलवरच व्हिडिओ रेकॉर्ड केला. यात तिने तिची कैफियत मांडली आणि तो व्हिडिओ उस्मानाबादमधील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्स अ‍प क्रमांकावर अपलोड केला. पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि पीडितेच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले. मुख्यालयातून हा व्हिडिओ येरमाळा पोलिसांना पाठविण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

पोलिसांनी पीडित तरुणीला आई-वडिलांच्या स्वाधीन केले होते. पिंपरी-चिंचवडच्या सांगवीतील घरी तिला पाठवण्यात आले. मात्र ज्याच्याशी तुझे लग्न लावून दिले आहे, त्याच्याशीच संसार करावा लागेल अशी बळजबरी आई-वडिलांनी केली. अखेर पीडितेने आई- वडिलांविरोधात थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले आणि तिथे आई-वडील, पती, त्याची पहिली पत्नी यासह पंधरा जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने दाखवलेल्या या धाडसाबद्दल तिचे कौतुकही होत आहे.

पाहा व्हिडिओ