News Flash

जायकवाडीच्या पाणी उपलब्धतेमुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न

जालन्यातून गाळपासाठी ऊस अन्य जिजिल्ह्यांमध्ये

(संग्रहित छायाचित्र)

लक्ष्मण राऊत

जायकवाडी प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाल्याने जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड या दोन्ही तालुक्यांत अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखाना आणि याच कारखान्याचे क्रमांक दोनचे युनिट असलेल्या सागर सहकारी कारखान्यांमध्ये कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करण्यावर मर्यादा आल्याने जिल्ह्यातील अन्य तीन कारखान्यांसह बाहेरच्या जिजिल्ह्यांतील १५ पेक्षा अधिक साखर कारखान्यांत या भागातील अतिरिक्त ऊस पाठविण्यात येत आहे. पाणी नसला की दुष्काळ आणि पाणी असले की ऊस हे चित्र अधिक गडद होताना दिसत आहे.

डाव्या कालव्याद्वारे पाण्याची उपलब्धता झाल्याने घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील जायकवाडीच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन वर्षांत उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांतील जवळपास २६ हजार हेक्टर ऊस पूर्णपणे गाळप करण्याचा प्रश्न चालू हंगामात (२०२०-२०२१) उभा राहिला. गेल्या ऑक्टोबरमध्ये गाळपाचा शुभारंभ करताना व्यवस्थापनाने ‘समर्थ’मध्ये आठ लाख टन तर ‘सागर’मध्ये पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले. तरीही जवळपास आठ लाख टन उसाचा प्रश्न होता. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अन्य एक सहकारी आणि दोन खासगी कारखान्यांसह औरंगाबाद, लातूर, जळगाव, बीड, सोलापूर, परभणी आदी जिजिल्ह्यांतील कारखान्यांमध्ये अतिरिक्त ऊस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी सहकारमंत्री आणि आयुक्तांच्या समवेत कारखाना व्यवस्थापनाच्या बैठका झाल्या. ज्यांच्याशी अतिरिक्त ऊस नेण्याचा करार झाला त्यापैकी काही कारखाने नंतरच्या काळात त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने बंद झाले. त्यामुळे आणखी काही कारखान्यांत ऊस पाठविण्याचा निर्णय झाला.

१८ एप्रिलपर्यंत ‘समर्थ’ आणि ‘सागर’मध्ये ११ लाख ८४ हजार टन उसाचे गाळप झाले. असे असले तरी कारखाना व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार या दिवशी कार्यक्षेत्रात उभ्या असलेल्या चार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांतून तीन लाख ६५ हजार टन उसाची उपलब्धता होणार आहे. या दोन्ही कारखान्यांत दररोज सात-आठ हजार टन ऊस गाळप होत असून जवळपास तेवढाच ऊस दररोज अन्य कारखान्यांत गाळपासाठी जात आहे. जायकवाडी प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे या भागात हमखास उत्पन्न मिळणारे पीक म्हणून शेतकऱ्यांचा कल उसाकडे वाढला आहे. परंतु त्यामुळे ‘समर्थ’ आणि ‘सागर’ कारखान्याच्या व्यवस्थापनापुढील समस्या वाढल्या आहेत.

‘ कुणाचाही ऊस राहणार नाही’

कार्यक्षेत्रातील सर्वांचा ऊस संपल्याशिवाय समर्थ आणि सागर हे दोन्ही कारखाने बंद होणार नाहीत. सर्वांचा ऊस गाळप व्हावा यासाठी सुरुवातीपासूनच शर्थीचे प्रयत्न करत असून दररोज आठ-दहा हजार टन ऊस बाहेरच्या कारखान्यांना जात आहे. बाहेरच्या आठ कारखान्यांना समर्थने तोडणी व वाहतूक यंत्रणाही दिली आहे. सभासदांचा ऊस घेण्यात येत असून बिगर सभासदांनी बाहेरच्या कारखान्यांना ऊस द्यावा. बिगर सभासदांचा ऊसही शिल्लक राहणार नाही. पुढील हंगामासाठी समर्थ आणि सागर कारखान्यांची गाळप क्षमता दोन-अडीच हजार टनांनी वाढविण्यात येत आहे. इथेनॉलचे दोन प्रकल्प उभे राहत आहेत. सध्याचाच ऊस अधिक असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नवीन ऊस लावू नये. पुढील हंगामात बाहेरच्या कारखान्यांकडेही मोठ्या प्रमाणावर ऊस असणार आहे. शेतकऱ्यांनी ‘तिर्री’चा ऊस ठेवू नये. त्याची नोंद कारखाना घेणार नाही.

– राजेश टोपे, सल्लागार, समर्थ सहकारी साखर कारखाना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:00 am

Web Title: question of excess sugarcane due to the availability of water in jayakwadi abn 97
Next Stories
1 Maharashtra Corona Update : २४ तासांत ५१९ रुग्णांचा मृत्यू; ६२,०९७ नवे करोनाबाधित!
2 “हात जोडतो, पण….”, राजेश टोपेंचं राज्यातील नागरिकांना कळकळीचं आवाहन
3 SSC Exams – राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!
Just Now!
X