21 February 2019

News Flash

बीडमध्ये रब्बीचे पीक उद्ध्वस्त

तब्बल १० हजार ६३२ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

 

 

काढणीला आलेली रब्बीची पिके आणि बहरलेल्या फळबागांना रविवारी पहाटे अवकाळी गारपीटीने तीन तालुक्याला झोडपून काढले. यात तब्बल १० हजार ६३२ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सर्वाधिक नुकसान फळबागांचे झाल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांना जास्त फटका बसला असल्याचा अंदाज प्राथमिक अहवालातून दिसून येतो. बीड तालुक्यातील काही भागात गारपीट झाली असली तरी प्रशासनाच्या अहवालात मात्र केवळ गेवराई, माजलगाव आणि शिरुर या तीन तालुक्यातच गारपीट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यतील गेवराई, माजलगाव आणि शिरुर तालुक्यासह बीड तालुक्यातील काही भागात रविवारी गारपीट व पावसाने रब्बीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. पपई, डाळींब आणि मोसंबी यांना सर्वाधिक फटका बसला आहे. सोमवारी या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. या अहवालात गेवराई, माजलगाव, शिरुर या तीन तालुक्यातील १० हजार ६३२ हेक्टर पिके बाधित झाली असून यात गेवराई तालुक्यातील ९ हजार ४०० हेक्टरचा समावेश आहे. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवला असल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.

आता श्रेयासाठीची राजकीय गारपीट

गारपीटीनंतर राजकीय पुढाऱ्यांनी दावे, प्रतिदावे करत मागण्यांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. खासदार प्रितम मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणी केली.

First Published on February 13, 2018 3:54 am

Web Title: rabi crop destroyed in beed due to unseasonal hailstorm