विखे यांची कबुली; आम्हीही गांभीर्याने पाहिले नाही; केंद्र व राज्याचे केवळ स्मार्ट सिटीवरच लक्ष

कोणतेही सरकार असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आमचीही (काँग्रेस) सत्ता दहा वर्षे होती, मात्र आम्हीही वेळेत पावले उचलली नाहीत, आत्महत्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही, त्यामुळे आम्हीही शेतकरी आत्महत्यांचे प्रायश्चित्त घेतलेच पाहिजे, अशी कबुली देतानाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारमध्ये जे सहभागी होते, त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब दत्तक घेऊन प्रायश्चित्त घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

विखे कुटुंबीयांनी नगर जिल्हय़ातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेतले आहे. त्यासाठी ‘पद्मभूषण बाळासाहेब विखे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब साहाय्य योजना’ सुरू केली आहे. त्याची सुरुवात गुरुवारी नगरमध्ये जैन सोशल फेडरेशनचे शांतिलाल मुथा व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शिक्षण, मुलींचे विवाह, एका पाल्याला पात्रतेनुसार नोकरी, घरदुरुस्ती, जीवनभर आरोग्य सुविधा, अपघात विमा, राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या वेळी पांगरमल दारूकांडात मृत्युमुखी पडलेल्या व अपंगत्व आलेल्या कुटुंबांनाही मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

शेतकरी आत्महत्येचे दायित्व सर्वच पुढाऱ्यांनी स्वीकारले, तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणारच नाही, मात्र सरकारला त्यासाठी प्राथमिकता बदलावी लागणार आहे. केवळ घोषणांनी शेतकऱ्यांचे भले होणार नाही. कोणत्याही सरकारने प्रभावीपणे उपाय केले नाहीत. स्मार्ट सिटी पलीकडे पाहण्यास सरकार तयार नाही. केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे या विषयावर गंभीर नाहीत.

आपल्या घरात अनेक पदे असल्याचे अनेकांना वाईट वाटते, मात्र आमच्या मागे जी लोकशक्ती उभी आहे, त्यातूनच ही पदे मिळाली आहेत, असाही दावा विखे यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत कृष्णा खोऱ्याचे पाणी नगर जिल्हय़ाला मिळवून देणारच, असे जाहीर करताना त्यांनी निळवंडे व म्हाळादेवी धरणाच्या माध्यमातून जिल्हय़ातील पुढाऱ्यांनी खासदारांना (स्व. बाळासाहेब) बदनाम केले, मात्र कोणालाही ते काम पूर्ण करता आले नाही.