08 March 2021

News Flash

रायगडात काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे वावडे!

रायगड लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी अशी भुमिका स्थानिक नेत्यांनी यावेळी मांडली.

जिल्ह्य़ात महाड, अलिबाग आणि पेण या तीन विधानसभा मतदारसंघात पक्षाने जनसंघर्ष यात्रेच्या पाश्र्वभुमीवर जाहीर सभा घेतल्या.

हर्षद कशाळकर, अलिबाग

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा शेवटच्या टप्प्यात कोकणात दाखल झाल्यावर वाताहत होत असलेल्या पक्षसंघटनेची घडी पुन्हा एकदा बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावाही या माध्यमातून घेण्यात आला. पण प्रदेशपातळीवर निवडणूक आघाडीसाठी पक्षनेते आग्रही असले तरी, रायगड जिल्हा काँग्रेस समितीने पुन्हा एकदा स्वबळाची आवई उठवली. आघाडीसाठी तडजोड करायची वेळ आलीच तर किमान स्थानिक परिस्थिती लक्षात घ्या अशी  विनंती जिल्ह्य़ातील नेत्यांनी केली आहे.

रायगड जिल्ह्य़ात अंतुलेंच्या निधनानंतर पक्षाला दिशादर्शक ठरेल आणि एकत्रित ठेवेल असे नेतृत्व शिल्लक राहिले नाही. ज्या राजकीय पक्षांसोबत पक्षाने तडजोड करण्याची भूमिका घेतली, त्याच राजकीय पक्षांनी काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण करण्याचा प्रयन केला. परिणामी पक्षाची वाताहत होत गेली. कार्यकर्त्यांची गत वादळात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे झाली. काहीनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर काहींनी राजकीय संन्यास स्वीकारणे पसंत केले.

अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला नव्याने उभारी देणे पक्षनेतृत्वासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे विस्कळीत झालेली पक्षाची घडी नव्याने बसवण्यात जनसंघर्ष यात्रा कितपत यशस्वी ठरणार आहे हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.जिल्ह्य़ात महाड, अलिबाग आणि पेण या तीन विधानसभा मतदारसंघात पक्षाने जनसंघर्ष यात्रेच्या पाश्र्वभुमीवर जाहीर सभा घेतल्या. मात्र माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी अलिप्त राहणे पसंत केले. पक्षासाठी ही एक चिंतेची बाब असणार आहे. कारण प्रतिकूल परिस्थितीत पेण मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व कायम राखण्याचे काम त्यांनी आजवर केले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्ह्य़ात शेकाप, राष्ट्रवादीच्या सोबत आघाडीसाठी प्रयत्न सुरू केल्याने  पाटील यांनी पक्षापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले. शेकाप हा काँग्रेसचा पारंपारीक विरोधीपक्ष असल्याने जिल्ह्यात  शेकापशी आघाडी होऊ नये यासाठी ते आग्रही आहेत. पण पक्षनेतृत्वाने याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

अलिबागमधून मधुकर ठाकूर आणि महाडमधून माणिक जगताप हे दोघही शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्यास इच्छुक नाहीत. तसे दोघांनीही जनसंघर्ष यात्रेच्या निमित्याने जाहिर बोलून दाखवले. रायगड लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी अशी भुमिका स्थानिक नेत्यांनी यावेळी मांडली. मात्र जनसंघर्ष यात्रेच्या निमित्याने विरोधी पक्षातील मत विभाजन टाळण्यासाठी आघाडी अपरिहार्य असल्याचे अशोक चव्हाण यांनी पुन्हा अधोरेखीत केले. पण तडजोड करताना पक्षहितास प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. पण स्थानिक पातळीवर शेकाप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोमीलन होणे अशक्य असल्याने आघाडी झालीच तर त्याचे भवितव्य काय राहील हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. सुनील तटकरे यांच्याबद्दलही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आघाडी झालीच तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना कितपत सहकार्य करतील याबाबतही साशंकता कायम राहणार आहे.

एकूणच जनसंघर्ष यात्रेच्या निमित्याने काँग्रेसने मरगळलेल्या पक्षसंघटनेला पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न केला. अलिबाग आणि महाडमध्ये झालेल्या दोन्ही सभांना स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण पक्षाचा उमेदवारच निवडणुकीत नसेल तर कार्यकर्ते काम करतील का हा संभ्रम कायम आहे.

तटकरे यांना विरोध  : गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांंनी सुनील तटकरे यांना मदत केली होती. या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत सहकार्य देण्याचे आश्वासन तटकरे यांनी रविशेठ पाटील आणि मधुकर ठाकूर यांना दिले होते. मात्र हा शब्द त्यांनी पाळला नाही. याचा परिणाम म्हणून पेण मधून रविशेठ पाटील यांचा तर अलिबागमधून मधुकर ठाकूर यांचा पराभव झाला. यामुळे तटकरेना यांना आता खिंडीत गाठण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने हालचाली सुरू केल्या असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.

रोहा तालुका सोडला तर जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यामध्ये काँग्रेसचे संघटन अजूनही कायम आहे. ही जागा गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली असली तरी यावेळी ती आम्हाला मिळावी, तर बॅरीस्टर अंतुलेचा पारंपारीक मतदार संघ असलेल्या रायगड मध्ये पक्षसंघटनेला उभारी मिळू शकेल.

      –  माणिकराव जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

******

पक्षाने ज्या पक्षांनसोबत आजवर आघाडी केली, त्यांनी स्वार्थासाठी काँग्रेसचा वापर केला. त्यामुळे पुढील निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांंची इच्छा आहे. आघाडीची वेळ आलीच तर स्थानिक परिस्थितीचाही विचार व्हावा.

– श्रध्दा ठाकूर, जिल्हाध्यक्षा  महिला काँग्रेस कमिटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:23 am

Web Title: raigad congress workers participate in jan sangharsh yatra
Next Stories
1 साखर आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर राजू शेट्टींनी मागे घेतलं आंदोलन
2 कोकण रेल्वे मार्गावर टळला अपघात, डबे सोडून इंजिन गेले पुढे
3 मुख्यमंत्री जालन्यात असतानाच भाजपा नेत्याची शेतकरी कुटुंबाला मारहाण
Just Now!
X