रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टीच्या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन , म्हसळा तालुक्यात पावसाचा अधिक जोर दिसत आहे. परिणामी जिल्हयातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

तर, भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात २४ तासात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नागरिकांना सतर्क राहण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा संपली आहे.  शुक्रवारी (दि. 4) रात्रीपासून रायगडात पावसाने दमदार पुनरागमन केले. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार होती. अधूनमधून जोरदार सरी येत होत्या, दुपारी जोरदार वारे देखील वाहत होते.  सुमुद्रात लाटा उसळत होत्या. पावसामुळे अलिबाग  शहारातील काही भागात पाणी साचले होते.

मान्सून यंदा वेळेत दाखल झाला. त्यामुळे भातपेरणी करण्यात आली होती.  तरी अपेक्षित पाऊस झाला नव्हता .  चक्रीवादळानंतर पावसाने दडी मारली होती.  त्यामुळे नागरिक हैराण होते , शेतीची कामे देखील रखडली होती .  पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. तो पावसाची वाट पहाता होता. शेतात पाणी नसल्यामुळे भात लावणीची कामे मंदावली होती.

जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. गेले दोन दिवस तुरळक सरी येत होत्या. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला.  या पावसामुळे भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यतची सरासरी ६४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

आज समुद्राला उधाण येऊन मोठ्या लाटा उसळतील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता . तसा इशाराही आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला होता . सुरक्षेचा उपाय म्हणून अलिबाग समुद्र किनारी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता .  मात्र अपेक्षित मोठ्या लाटा उसळल्याचे दिसले नाही .मात्र समुद्र चांगलाच खवळलेला होता .

जिल्हभरात काल झालेल्या पावसाची तालुकावार आकडेवारी (मिमी) –
अलिबाग – ४५ मिमी, पेण – ४० मिमी, मुरुड – ६९ मिमी, पनवेल – ९२.२०मिमी, उरण – ७३ मिमी, कर्जत – १४.६० मिमी, खालापूर – ३४ मिमी, माणगाव – ६० मिमी, रोहा – ८३ मिमी, सुधागड – ६५ मिमी, तळा – १४१ मिमी, महाड – १२ मिमी, पोलादपूर – ४८ मिमी, म्हसळा – ६५ मिमी, श्रीवर्धन – ८८ मिमी, माथेरान – ४५.६० मिमी असा सरासरी – ६०.९८ मिमी पाऊस झाला आहे.

दरम्यान मुंबईत देखील आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ’अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली त्यानंतर आज सकाळी देखील पावासाची रिपरिप सुरू झाली.. संततधारेमुळे शहराच्या अनेक भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचले. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.

दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांसह संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्याच्या बहुतांश भागात सध्या पाऊस हजेरी लावतो आहे. राज्यातील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे कोकणपासून विदर्भापर्यंत विविध ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे.