बीड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्य़ांत शनिवारी तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दमदार बरसात केली. बीड जिल्ह्य़ात चिंचोटी (तालुका वडवणी) येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर हिवरगव्हाण येथे मंदिरावर झाड पडल्याने आठजण जखमी झाले. हिंगोली जिल्ह्य़ात जलालधाबा (तालुका औंढा नागनाथ) येथील लक्ष्मण साबळे यांच्या शेतात रात्री वीज पडल्याने त्यांचे दोन बल दगावले. साबळे हेही विजेचा झटका बसल्याने गंभीर भाजले. सुदैवाने वेळीच उपचार झाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्य़ातही जोराच्या वाऱ्यासह शनिवारी हा पाऊस बरसला.
बीड शहरासह गेवराई, वडवणी, परळी, धारूर, अंबाजोगाई तालुक्यांत अवकाळीचा जोर कायम होता. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांनी झोडपून काढले. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने नगररस्ता, बार्शीरस्ता भागात झाडांसह विजेचे खांब पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. गेवराई तालुक्यात तासभर, तर  परळीतही पावसाने झोडपून काढत आंबा, चिकू, डाळिंब, मोसंबीबागांचे नुकसान केले. वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे दुपारी वीज कोसळून श्रीराम सोपान पाचणकर (वय ४२) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर हिवरगव्हाण येथे वादळामुळे मंदिरावर झाड पडल्याने आठजण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव तालुक्यात सलग दोन तास पाऊस झाला.
उरल्या सुरल्या पिकांवरही घाला
हिंगोली – कमी व उशिराने पडलेल्या पावसाने खरीप-रब्बी हंगामांत शेतकऱ्यांना अपेक्षित पीक घेता आले नाही. मात्र, थोडय़ा-फार पाण्यावर शेतकऱ्यांनी मोठय़ा दाडसानेच घेतलेल्या पिकांना गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच ग्रासून टाकले. वसमत व औंढा तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे केळी, हळद, कांदे, गहू, ज्वारीसह फळपिकांची वाट लागली. औंढा नागनाथ तालुक्यातील जलालधाभा येथे लक्ष्मण साबळे या शेतकऱ्याचे दोन बल वीज पडल्याने दगावले. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन अनेक गावे अंधारात बुडाली.
सुरूवातीच्या अवकाळी पावसाने रब्बीसह फळपिकांचे मोठे नुकसान केले. आता अवकाळी पाऊस थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. वसमत, औंढा नागनाथ व िहगोली तालुक्यांत गुरुवारपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला. अनेक घरांवरील पत्रे उडाले. झाडे, विजेचे खांब पडले. अनेकांचे संसार उघडय़ावर पडले. वसमत तालुक्यात हळद, केळी, ज्वारी, गहू, कांदे, टरबुज, संत्रा आंबा पिकांची मोठी हानी झाली. वसमत तालुक्यात केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीची बाग भुईसपाट झाली. कांदा, हळद पिकांचेही मोठे नुकसान झाले. औंढा नागनाथ तालुक्यातील जलालधाबा येथील लक्ष्मण साबळे यांच्या शेतातील आखाडय़ावर रात्री वीज पडल्याने त्यांचे दोन बल जागीच मृत्युमुखी पडले. साबळे हेही विजेचा झटका बसल्याने गंभीर भाजले गेले. वेळीच उपचार झाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे. वसमत तालुक्यातील कौठा, बोराळा, फुदनापुर, किन्होळा, म. वाडी, पांगरा िशदे, शिरळी, बोल्डा, हयातनगर, कुपटी आदी गावांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथमध्ये शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाच्या सरी बरसल्या.
औरंगाबादेतही पाऊस
औरंगाबाद – अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीचा कहर औरंगाबाद शहर व परिसरात शनिवारीही सुरूच राहिला. दुपारी तीननंतर सुमारे अर्धा-पाऊण तास विजांचा कडकडाट व सोसाटय़ाच्या वाऱ्यासह बरसलेल्या टपोऱ्या थेंबांनी वातावरणातील सगळा नूरच बदलून टाकला. संध्याकाळीही पावसाची सर येऊन गेली. पावसाळ्यात पडतो तसा जोरदार पाऊस दुपारी झाला. या वेळेत शहराचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. सिल्लोड तालुक्यात गाराही पडल्याचे वृत्त आहे. मराठवाडय़ात बहुतेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड आदी जिल्ह्य़ांत कमी-अधिक प्रमाणात या पावसाने हजेरी लावली. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण होत आहे.