मराठवाडय़ावर पावसाची कृपा; मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात वृष्टी
राज्यातील दुष्काळी स्थितीत मोठय़ा व दमदार पावसाची अपेक्षा असताना राज्याच्या काही भागांत मंगळवारी वादळी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील तीन-चार दिवस अशाच सरी पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
ऐन पावसाळ्यात पावसाने तब्बल दोन महिने ओढ दिल्यामुळे राज्यात दुष्काळाचे संकट आहे. धरणांमध्येही अपुरा पाणीसाठा आहे. अशा स्थितीत सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत वादळी पावसाच्या सरी पडत आहेत. मंगळवारीसुद्धा मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ांमध्ये अनेक ठिकाणी दुपारनंतर वादळी सरींनी हजेरी लावली. पुणे शहरातही जवळजवळ दीड महिन्यांनंतर जोरदार सरी बरसल्या. याचप्रमाणे कोकणात रत्नागिरी व इतर काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात नागपूरच्या परिसरात मोठा पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या संपूर्ण आठवडय़ात काही भागात अशाच प्रकारे वादळी पाऊस अपेक्षित आहे.
तीव्र दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या उस्मानाबाद, लातूर या जिल्हय़ांसह मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हय़ांतही काही महसूल मंडळांत चांगला पाऊस झाला. १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

वीज पडून मुलाचा मृत्यू
औरंगाबाद जिल्हय़ातील पैठण तालुक्यात मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या वेळी शेतात वीज पडून फारूख महेताब शेख (वय १३) या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याची बहीण सुलताना (वय १५) गंभीर जखमी झाली.

चारा संकट लांबणीवर
उस्मानाबाद जिल्हय़ात तेर व तुळजापूर तालुक्यांतील सावरगाव महसूल मंडळातही अतिवृष्टी झाली. पावसामुळे चाऱ्याचे संकट काहीअंशाने का असेना पुढे गेले असल्याचे सांगितले जाते.

जलयुक्त शिवारभरले
’पाणीटंचाई असणाऱ्या उस्मानाबाद व लातूर जिल्हय़ांत दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या विविध बंधाऱ्यांत पाणी साठले.
’पुढील महिनाभर तरी फारशी काळजी न करण्याइतपत हा पाऊस असल्याचे मानले जाते. जालना जिल्हय़ाच्या परतूर तालुक्यातील सातोना येथे ९० मिमी पाऊस झाला.
’सर्वाधिक पाऊस हिंगोलीत नोंदवला गेला. बीडच्या परळी तालुक्यातील निम्म्या भागात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील नागापूर महसूल मंडळात ७० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, अन्यत्र फारसा पाऊस झाला नाही.