गायब झालेली थंडी आता दिवाळीत भाऊबीजेनंतर अवतरली असून यातच पावसाची संततधार हजेरीही लागत असल्याने चांगलाच गारठा सोलापूरकर अनुभवत आहेत. रविवारी पहाटेपासून दिवसभर पावसाची रिपरिप चालू राहिल्याने सूर्यदर्शन झाले नाही.
काल शनिवारी उष्णता, पाऊस आणि नंतर गारठा यांचा एकाच दिवशी अनुभव घेण्यात आला. रात्री गारठा निर्माण झाल्यानंतर रविवारी पहाटेपासून सर्वत्र पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली. दिवसभर गारठा आणि पाऊस यामुळे रविवारच्या सुटीत नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. हा गारठा आरोग्याला घातक असल्याचे मानले जाते. रविवारी दिवसभरात सोलापूरचे कमाल तापमान २२.८ अंश सेल्सियस तर किमान तापमान १८.८ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविण्यात आले. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ७ मिली मीटर इतका पाऊस पडला.
जिल्ह्य़ात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा, मोहोळ, करमाळा व माळशिरस या सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पडला. सरासरी ३.३१ मिमी याप्रमाणे जिल्ह्य़ात ३६.४२ मिमी इतका पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.