बेळगातील गोगटे रंगमंदिरात शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावडांच्या संबंधावर प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत पण त्यांचं कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे. दोघांच्या वाटा वेगळ्या असतील, त्यांचे विचार वेगळे असतील, पण त्यांचं नातं कायमचं राहणार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.’

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

प्रकट मुलाखतीत संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी संजय राऊत भावूक झाले होते. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या अनेक चुका पोटात घातल्या. शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केलं नसतं तर देशाला आज संजय राऊत दिसला नसता. वृत्तपत्रांमध्ये क्रांती करण्याची ताकद आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उलथापालथ करण्याची ताकद आहे. बाळासाहेब ठाकरे रोज २२ दैनिकं वाचायचे.

सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही

भाषांमध्ये वाद असू नये, कारण आपला देश एक आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी कन्नडिगांना टोला लगावला. यावेळी सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध नाही. याठिकाणी दोन्ही बाजूने पांडव आहेत, केवळ थोडा भाषेचा आणि संस्कृतीचा झगडा आहे. कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे. गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, रजनीकांत यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

व्याखानमालेसाठी जमताय ही आनंदाची बाब आहे. नाथ पै काय बोलतात हे ऐकायला नेहरूजीही थांबायचे. बेळगावशी बॅ. नाथ पै यांचं जिव्हाळ्याचं नात होतं. बेळगावमध्ये मराठी भाषेची मशाल पेटलेली आहे. बेळगावमध्येच नाही तर महाराष्ट्रातही मराठीसाठी लढावं लागतेय, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

कन्नड शाळा टिकवण्यासाठी शिवसेनेची भूमिका

भाषे भाषेमध्ये वाद असायला नको, कारण देश एक आहे. मुंबई, सोलापूरसह इतर महाराष्ट्रतील जिल्ह्यातील कानडी भाषेंच्या शाळांना अनुदान देण्याचं काम आम्ही करतोय. ज्या महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे, तेथील कन्नड शाळा टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील शाळांना अनुदान किंवा हवी ती मदत केली जातेय. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठिकाणी कन्नड शाळांना अनुदान दिलं आहे. कन्नड साहित्यकांचं मराठी भाषेमध्ये मोठं योगदान आहे.

खर्गेंशी मराठी गप्पा

काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी आहेत. ते मूळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात खर्गे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. आम्ही त्यांच्याबरोबर शुद्ध मराठीतच बोलतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

बेळगावात संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा

बेळगाव येथील व्याखानासाठी शनिवारी खासदार संजय राऊत यांचे शनिवारी दुपारी बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेने विमानतळ परिसर दणाणून सोडला. खासदार राऊत यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

राऊतांच्या मुक्काम ठिकाणात बदल
संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यावरून बेळगाव सीमाभागात प्रचंड उत्सुकता दाटलेली आहे. त्याच वेळी राऊत यांचे बेळगावातील आजचे मुक्कामाचे हॉटेल बदलण्याबाबत पोलिस प्रशासनाने आयोजकांना सांगितले. यापूर्वी राऊत यांच्या मुक्कामासाठी बेळगाव शहरातील क्लब रोड येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. मात्र आता पोलिसांच्या सुचनेनुसार त्यांचा आजचा बेळगावातील मुक्काम शहरापासून काही अंतरावर असलेल्या काकती गावाजवळील मेरेओट हॉटेलात आहे.

कनसेची बकबक
बेळगाव येथे काल कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची गळचेपी केली होती. आज खासदार राऊत बेळगावात येणार असल्याने कर्नाटक नवनिर्माण सेनेचा नेता भीमाशंकर पाटील याने आपली बकबक सुरु ठेवली. मराठी भाषिकांना कर्नाटकातून महाराष्ट्रात हाकलून देऊ, अशी भाषा वापरली. मात्र त्याच्या बडबडीकडे लक्ष देण्याची गरज नसल्याची भावना बेळगावकरांनी व्यक्त केली.