News Flash

राजाराम शेळकेच्या हत्येची स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल; आणखी दोघांना अटक

राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम याच्या मनात होती.

राजाराम शेळके

संग्राम कांडेकरकडून वडिलांच्या हत्येचा सूड

पारनेर: नारायण गव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येचे गूढ उकलले असून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संग्रामने तलवारीने वार करीत राजाराम यास जागीच ठार केल्याची कबुली त्याने शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली.

राजकीय वर्चस्व,आपसातील भांडणांच्या कारणावरून नारायण गव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री नेमबाजाकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती.याप्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राजारामसह इतर आरोपींना न्यायालयाने विशेष रजा मंजूर केली असून वर्षभरापासून राजाराम नाराणगव्हाण येथील त्याच्या शेतामध्ये वास्तव्यास होता.

राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम याच्या मनात होती. राजाराम तुरुंगातून आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार उपलब्ध करून ठेवली होती. घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस संग्राम राजाराम याच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संधी संग्राम शोधत होता. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजाराम शेतामधील शेततळ्याचे काम करणाऱ्या मजुरांना सूचना देऊन एकटाच परतत होता.ती संधी साधत संग्रामने पाठीमागून येत राजारामच्या मानेवर तलवारीचा जोरदार वार के ला. एकाच वारामध्ये राजाराम जमिनीवर कोसळला. संग्रामने पुन्हा त्याच्या मानेवर आणखी दोन वार करून तो पुन्हा उसामध्ये जाऊन लपला. पहिल्याच वारामध्ये राजाराम गतप्राण झाला.वार झाल्यानंतर राजाराम याच्या तोंडातून शब्ददेखील फुटला नाही. संग्रामने ही माहिती पोलिसांना दिली.

राजाराम शेळके याच्या हत्येप्रकरणी गणेश भानुदास शेळके व अक्षय पोपट कांडेकर यांना शनिवारी अटक करण्यात आली. गणेश शेळके नगर येथे पोलीस दलात चालक पदावर कार्यरत आहे. त्याला नगर येथून ताब्यात घेण्यात आले.अक्षयला म्हसे (श्रीगोंदे) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. रविवारी दोनही आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. वकील बाळासाहेब कावरे यांनी आरोपींच्या वतीने काम पाहिले.याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे.

थंड डोक्याने कृत्य

हत्येच्यावेळी संग्रामने दोन टी शर्ट परिधान केले होते. हत्येनंतर रक्ताचे डाग पडलेला वरचा टी शर्ट त्याने उसामध्ये फेकून दिला. तलवार घराजवळील डेअरीत लपवली.थंड डोक्याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्यानंतर संग्राम शांतपणे दुचाकीवरून शिरूर येथे गेला. एटीएममधून पाचशे रुपये काढून त्याने पानाचा आस्वाद घेतला. त्यानंतर काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संग्राम यास अटक केली. संग्राम याने शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे गुन्ह्यची कबुली दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 2:03 am

Web Title: rajaram shelke s murder solved by local crime branch zws 70
Next Stories
1 मृगातील पहिल्याच पावसाने नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला
2 करोनाच्या दुसऱ्या लाटेत अमरावती विभागात ३४१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
3  ‘हनी ट्रॅप’मध्ये तरुण, तरुणींना अडकवून ‘ब्लॅकमेलिंग’
Just Now!
X