भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली असतानाच आज राज्यात विविध शहरांमध्ये संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ ‘सन्मान मोर्चा’ काढण्यात आला आहे. सांगलीत कडेकोट बंदोबस्तात मोर्चा निघाला असून पुण्यातील मोर्चात भीमा कोरेगाव हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फंटागडेची आई देखील सहभागी झाली होती.  मराठा असल्यानेच राहुलची हत्या केली का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटेंना अटक झाली असली तरी संभाजी भिडेंना अद्याप अटक झालेली नाही. संभाजी भिडेंच्या अटकेसाठी सोमवारी आंबेडकरवादी संघटनांनी मुंबईत एल्गार मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज (बुधवारी) राज्यात विविध शहरांमध्ये ‘गुरुवर्य सन्मान महामोर्चा’ काढण्यात आला. सांगलीसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पणजीमध्ये भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ एकाच वेळी बुधवारी सकाळी १० वाजता मोर्चे काढण्यात आले.

मुंबई आणि पुण्यातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ‘शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये’, म्हणून पुणे पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली.  पोलिसांनी परवानगी नाकारल्याने समर्थकांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. घोषणाबाजी केल्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदनही दिले.

पुण्यातील मोर्चात मिलिंद एकबोटे यांच्या वहिनी ज्योत्स्ना एकबोटे देखील सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की,भीमा कोरेगाव येथील दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांचा काही ही संबंध नसताना अडकवण्यात आले आहे. त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

UPDATES:

> मराठा असल्यानेच राहुलची हत्या केली का?: राहुल फटांगडेच्या आईचा सवाल

> भीमा कोरेगाव हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फटांगडेची आई पुण्यातील मोर्चात सहभागी.

> सांगलीत भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चाला सुरुवात

सांगलीत भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चा

> खोटे गुन्हे मागे घ्यावे, मिलिंद एकबोटे यांची सुटका करावी, संभाजी भिडे यांना खोटे गुन्ह्यात अडकवण्यात आले; पुण्यात समर्थकांची घोषणाबाजी

> पुण्यात लाल महालापासून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकराल्यानंतर नदी पात्रातून मोर्चाला सुरुवात

> मुंबईत आझाद मैदानात भिडेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

> सांगलीत मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ८०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात.

> मोर्चासाठी सुमारे एक लाख शिवभक्त उपस्थित राहतील, असा दावा केला जात आहे.

> सांगलीत पुष्पराज चौकापासून मोर्चाला प्रारंभ होईल. राममंदिर, काँग्रेस भवनमार्गे स्टेशन चौकामध्ये मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चापुढे कोणाचेही भाषण होणार नसून शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन करण्यात येईल. यानंतर सात कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन रितसर निवेदन देतील.