स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माण करण्यास आरपीआयचा पाठिंबा नाही. मात्र स्वतंत्र विदर्भास पाठिंबा आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास पहिला मुख्यमंत्री आरपीआयचाच होणार असल्याचा दावा खासदार रामदास आठवले यांनी केला.

कणकवली येथील पत्रकार परिषदेत खासदार रामदास आठवले बोलत होते. यावेळी कोकण प्रदेश उपाध्यक्ष रमाकांत जाधव, प्रा. आर. एल. तांबे, शरद कांबळे, प्रदेश सचिव मधु मोहीनी, उपाध्यक्ष महेंद्र शिर्के, तानाजी कांबळे आदी उपस्थित होते.

आरपीआय पक्ष महायुतीत सहभागी असला तरी भाजपा-शिवसेनेच्या प्रत्येक मताशी सहमत नाही. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला माझा व माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे असे खासदार आठवले म्हणाले. युती सरकारने मंत्रीपदाचे आश्वासन देऊनही आमची निराशाच केल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीदिनी २६ जानेवारी रोजी कन्याकुमारी येथून ही भारत भीम यात्रा निघाली आहे. ही यात्रा सिंधुदुर्गातून गोवा राज्यात जाणार आहे. १ मे रोजी महू येथे यात्रेचा समारोप होणार आहे. २७ राज्यांचा दौरा करून समतारथ जाती तोडा समाज जोडीचा संदेश जनतेपर्यंत पोहचवित आहे असे खासदार आठवले म्हणाले.

डॉ. आंबेडकरांच्या सविधानानंतरही खेडय़ापाडय़ात अत्याचार सुरू आहेत. ही जाती व्यवस्था या समता रथाच्या माध्यमातून नष्ट करण्याचा संदेश पोहोचवायचा आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अर्थसहाय्य करण्याची मागणी देशातील काही राज्य सरकाराकडे मी केली आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या राज्यांना २५ कोटीचे अर्थसहाय्य करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे, असे खासदार आठवले म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख यांनी एकला-चलो रेच्या घेतलेल्या भूमिकेबाबत आठवले म्हणाले, प्रत्येकाने स्वत:च्या पक्षाची ताकद आजमावयाला हरकत नाही. मात्र तसे वेगळे लढाल, तर पडाल. त्यामुळे मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार करणार आहे असे खासदार आठवले म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार उद्धव ठाकरेच असल्याचे त्यांनी निवडणूकीत सिद्ध केले आहे असे आठवले म्हणाले.